१ वर्ष होऊनही मेहनतीचे पैसे दिले नाहीत…पोलिसही प्रतिसाद देत नसल्याने प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हतबल होऊन केली नावे जाहीर
मराठी इंडस्ट्री असो किंवा हिंदी इंडस्ट्री आपल्या कामाचे पैसे मिळवण्यासाठी सगळ्यांनाच तारेवरची कसरत करावी लागते. कधीकधी पैसे न मिळाल्याने निराशा हाती येते. काही दिवसांपूर्वी शशांक केतकर असो किंवा गौतमी देशपांडे असो सोशल मीडियावर त्यांनी हे उघडपणे बोलुन दाखवले होते. आता याच जोडीला आणखी एका मराठी अभिनेत्रीला हा त्रास सहन करावा लागत आहे. अभिनेत्री नृत्यांगना मीरा जोशी ही गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. पण नुकतेच एका चित्रपटासंदर्भात कामाचे पैसे न मिळाल्याची तिने तक्रार केलेली आहे.
एक वर्ष होऊनही आपल्याला पैसे मिळाले नसल्याचे तिने या तक्रारीत म्हटले आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये मीरा जोशीने ‘जिद्दी सनम’ या चित्रपटासाठी काम केले होते. पण आजतागायत या कामाचे तिला पैसे मिळाले नाहीत. यासंदर्भात तिने सिंटा कडे तक्रारही दाखल केली होती. पण त्याचा पुढे काहीच उपयोग झाला नाही असे तो म्हणते. पेमेंट मिळावं म्हणून तिने शक्य तेवढे प्रयत्न केले. २०२३ मध्ये ४ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर असे पहिल्या शेड्युलमध्ये तिने काम केलं होतं. या कामाचे आठवड्यात पैसे देण्यात येतील असे तिला सांगण्यात आले होते.
तिचं या भूमिकेसाठी सिलेक्शन ऐनवेळी करण्यात आल्याने ऍग्रिमेंट करायला वेळ मिळाला नाही. पण ऍग्रिमेंट केलं नसल्याने पोलिसही आता तिला मदत करण्यास टाळाटाळ करत आहेत. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने या गोष्टी समोर मांडल्या आहेत. निर्माते दिग्दर्शक यांची नावं जाहीर करत मिराने तिच्या कामाचे पैसे मागितले आहेत. किमान सोशल मीडियावर तरी या लोकांची नावं जाहीर केल्यानंतर तिला पैसे मिळतील अशी एक आशा तिने व्यक्त केली आहे. अरविंद राजपूत आणि शैजान शेख या निर्मात्या टीमने कामाचा मोबदला द्यावा म्हणून मिराने हा पर्यायी मार्ग स्वीकारला आहे.