news

व्यंग असलेली माणसं बाहेरच्या जगात खूप सोसावं … अभिनेत्याने व्यक्त केली खंत

कमी उंची असलेल्या व्यक्तींना समाजात हीन दर्जाची वागणूक मिळते पण या व्यंगावर मात करत अनेकांनी मराठी सृष्टीत एक कलाकार म्हणून मानाचं स्थान मिळवलं आहे. अशातच शारीरिक उंचीने कमी असलेल्या कांचन पगारे जाहिरात क्षेत्रात चांगलाच जम बसवताना पाहायला मिळाला. नुकताच त्याने शॉर्ट अँड स्वीट हा चित्रपट पाहिला. या चित्रपटात अशाच एका बुटक्या व्यक्तीची प्रेमकथा दाखवली आहे. त्यामुळे कांचनने त्याच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. तो म्हणतो की, “आपल्याकडे ना व्यंग असलेल्या लोकांकडे बघण्याची एक वेगळीच परंपरा आहे. परंपरा यासाठी की पूर्वी शिक्षण घेण्याचं प्रमाण कमी होतं किंवा एकूणचं सामाजिक प्रगती कमी असल्याने या गोष्टी होत असायच्या. पण आता जग, शिक्षण व्यवस्था इतकी बदलून सुध्दा आपल्या वैचारिक पातळीत त्या प्रमाणात प्रगती झालेली दिसत नाही.

short and sweet
short and sweet

आणि म्हणून व्यंग असलेला माणूस हा हेटाळणीचा प्राथमिक विषय आजही असतो. काही प्रमाणात सोशल मिडीया मुळे लोक बदलले आहेत पण तरीही व्यंग असलेल्यांकडे बरोबरीचा माणूस बघण्यापेक्षा दयेचा भाग अधिकचा असतो. यामुळेही व्यंग असलेला माणूस प्रगतीच्या सामाजिक मान्यतेच्या परिमाणात तितकासा पुढे येऊ शकत नाही किंवा फारच अपवादानेच एखाद दुसरा आपल्याला या प्रगतीच्या पटलावर चमकतांना दिसू शकतो. शक्यता यासाठी की तसं रूढ अर्थाने घडतांना दिसत नाही. या हेटाळणीमुळेच व्यंग असलेला डिप्रेस होऊन स्वत:ला अधिक कमजोर समजून घ्यायला लागतो,व्यसनाधीन होतो. दयेवर जगणं अधिक सोप्पं असं मानून आला दिवस ढकलायला लागतो किंवा अतिविचारी असेल तर स्वत:ला संपवून घेतो. व्यंग असलेली माणसं बाहेरच्या जगात हेटाळणी, दया यांचे विषय असतातचं पण त्यांच्या स्वत:च्या घरात देखील त्यांच्या बाबतीत घरातील लोक त्यांच्या वागण्यातून काहीतरी कमी आहे किंवा तू वेगळा आहेस असं त्यांच्याशी वागून त्याच्यावर नकळत कमजोरपणाचे संस्कार करत असतात. त्यातल्या त्यात कमी उंचीचा माणूस हा आपल्या भारतीय माणसाचा अत्यंत जवळचा आणि सहज हेटाळणीचा विषय.

short and sweet marathi film
short and sweet marathi film

बऱ्यापैकी उंची असलेली लहान मोठी सगळी भारतीय माणसं (यात स्त्रींयासुध्दा) बुटक्या माणसांकडे ज्या एका वेगळ्या कुत्सित आणि स्वत:च्या उंचीच्या घनेंडीने बघून जो आसुरी आनंद घेतात त्याविषयी न बोललेलचं बरं. काही आईबाप आपल्या मुलांना जगातलं आठवं आश्चर्य दाखवल्यासारखं बुटकी माणसं दाखवतात आणि तीच मुलं हाचं संस्कार घेउन आयुष्यात वागत असतात. सिनेमा काही अर्थी हा संस्कार रूजवायला कारणीभूत आहे असं मानलं तर आपण सिनेमातले विनोद फार गंभीरपणे स्वीकारतो आणि तो आयुष्यभर बाळगतोही आणि गंभीरता विनोदासारखी विसरून जातो असं म्हंटलं तर अतिशयोक्ती होणार नाही असं मला वाटतं. एकूणात सामाजिक मनोविज्ञान या विषयांत आपण अजूनही अश्मयुगीन आहोत हे खेदाने म्हणण्यांस खूप वाव आहे. काल संध्याकाळी याचं विषयाशी निगडित असलेला “शॅार्ट ॲंड स्वीट” हा चित्रपट पाहीला. खरंतर अश्या विषयावर सिनेमा बनवण्यासाठी खूप हिंमत असावी लागते ती हिंमत शुभम प्रोडक्शन आणि दिग्दर्शक गणेश कदम यांनी दाखवलीयं याबद्दल त्यांना दाद द्यावी तितकी कमीच आहे पण खूप खूप अभिनंदन आणि आभार एका सहज दुर्लक्षिलेल्या म्हणा किंवा सामाजिक दृष्ट्या सहज, हेटाळणीपूर्वक विषयावर सिनेमा बनवून तो प्रदर्शित केल्या बद्दल. आपल्या मुलाने आपल्यामुळे आपल्यासारखे चेष्टेचे, हेटाळणीचे भोग भोगू नयेत म्हणून एका बापाने केलेल्या त्यागाची गोष्ट म्हणजे #शॅार्टॲंडस्वीट हा चित्रपट. दिग्दर्शकाने, लेखकाने लिहीलेल्या गोष्टीला आपलसं करून सिनेमा केला की असा सुंदर चित्रपट आपल्यासमोर येतो. श्रीधर वटकर, मित्रा काय काम केलयं तू… अशी शरीरयष्टी असलेल्या नटाकडून त्याच्या ॲपिरिअन्समुळे तोल जाण्यची अनावधानाने का होईना शक्यता खूप असते पण ते तू अतिशय हुशारीने तुझ्या कायिक अभिनयाने समतोल राखण्यास यशस्वी झालास याचं खूप बरं वाटलं … सयंत, ठहराव आणि केवळ लाजबाब.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button