छावा चित्रपटातील बाल शंभूराजे साकारणारा मुलगा आहे खुपच खास. .. चिपळूणच्या चिमुरड्याचे होतेय कौतुक

छावा चित्रपटामुळे बरेचसे चेहरे प्रकाशझोतात आलेले पाहायला मिळाले. यात बाल शंभू राजेंची भूमिका देखील प्रेक्षकांना विशेष भावली. औरंगजेबाच्या नजरेला नजर देऊन भिडणारा बालसंभाजी या चिमुरड्याने सहजसुंदर निभावला. ही भूमिका साकारली अभिनव सचिन साळुंखे याने. चिपळूणमधील बोरगावचा राहणारा अभिनव छावा चित्रपटामुळे ओळखला जाऊ लागला आहे. सध्या मुंबईतील चेंबूर भागात तो वास्तव्यास आहे. श्री सनातन धरम विद्यालयात तो सातवी इयत्तेत शिकत आहे.
अभिनवला लहान असल्यापासूनच अभिनय, मल्लखांब आणि नृत्याची आवड आहे. अर्थात आईवडिलांच्या प्रोत्साहनाशिवाय हे घडलं नसतं. पण अभिनवने देखील मल्लखांब सारख्या साहसी खेळात गोडी वाढवली. यातूनच छावा चित्रपटात त्याला झळकण्याची संधी मिळाली. टबलिंग अकॅडमी ऑफ जिम्नॅस्टिक मधून सुनील गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने मल्लखांबचे धडे गिरवले. छावा चित्रपटाची एक टीम बालकलाकाराच्या शोधात तिथे आली. तिथल्या मुलांच्या काही ऑडिशन घेण्यात आल्या. यामधूनच अभिनवची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली.

पहिल्याच चित्रपटात बॉलिवूड सृष्टीत त्याला झळकण्याची संधी मिळाली. अक्षय खन्ना, आशुतोष राणा अशा मातब्बर कलाकारांसोबत त्याला अभिनयाची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत अभिनवने त्याचाही अभिनय सहजसुंदर बनवला आणि प्रेक्षकांच्या मनावर एका छाप सोडली. भविष्यात अभिनवला अभिनय क्षेत्रात उत्तुंग यश मिळो हीच एक सदिच्छा!.