बाप्पा बघतोय ना हे? शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याला… देवाच्या दारी गरीब श्रीमंतीवरून महेश टिळेकर यांचे रोखठोक मत
“बाप्पा बघतोय ना हे ?” सेलिब्रिटी आणि सामान्य माणूस यांना लालबागच्या दर्शनाला वेगळी वागणूक का? म्हणत दिग्दर्शक, निर्माते महेश टिळेकर यांनी या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. लाल बागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात. पण या गर्दीत कुठेतरी दोन गट विभागले आहेत का ? असाच प्रश्न समोर उभा राहिलेला पाहायला मिळतो. सामान्य माणसाला अगदी ढकलतच दर्शन घ्यावे लागते पण त्याच दुसऱ्या बाजूला सेलिब्रिटींना आदराची वागणूक दिली जाते. राजाचे दर्शन घेताना सेलिब्रिटी मोठ्या थाटात उभं राहून फोटोसुद्धा काढून घेतात मात्र इथे सामान्य माणसाला धड स्पर्शही करून दिला जात नाही.
याच व्यवस्थेवर महेश टिळेकर यांनी खंत व्यक्त करताना म्हटले आहे की, “बाप्पा बघतोय ना हे? देवाच्या दारी श्रीमंत – गरीब असा भेद नसतो हे थोरामोठ्यांनी संतांनी सांगितलेलं आपण खरं मानत आलोय..पण काळाप्रमाणे हे सगळंच बदलत चाललंय. शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याला तळतावरील फोडा सारखं जपत आणि शिल्पाच्या केसालाही धक्का लागणार नाही याची काळजी घेत त्यांना escort करत राजाच्या पायाशी घेऊन जाणारे आणि त्यांना मन तृप्त होईपर्यंत डोळे भरून बाप्पा राजाचे दर्शन घडविणारे कार्यकर्ते सामान्य जनतेला राजाचे दर्शन घेताना क्षणात खेचून बाहेर ढकलताना पाहिले की यांना कसलाच मायेचा पाझर नाही का ? असा प्रश्न पडतो. सेलिब्रेटींना पायघड्या जरूर घाला, त्यांच्यामुळे मंडळाची शान लौकिक वाढतही असेल पण सामान्य जनतेनं काय घोडं मारलंय म्हणून त्यांना जनावरां सारखं बाप्पाच्या चरणी आल्यावर वागणूक मिळावी.
सेलिब्रेटींना सहजपणे दर्शन घडवून देऊन त्यांना खुश ठेवणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपण दुसरीकडे किती असंख्य भक्तांचे शिव्या शाप खात आहोत ,रोष ओढवून घेत आहोत याचा विचार करावा. मागच्या काही वर्षांपासून हे प्रमाण वाढत असूनही याच्यावर अंकुश बसण्यासाठी पोलीस आणि सरकार काहीच कसे करू शकत नाही ? इतके हतबल का ???” असे म्हणत महेश टिळेकर यांनी लक्ष वेधून घेतले आहे. या व्यवस्थेत सुधारणा होणार की असेच चित्र पुढेही पाहायला मिळणार हा मोठा प्रश्न समान्यांनाही पडला आहे.