महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज पहाटे ३ च्या सुमारास दुःखद निधन झाले आहे. मनोहर जोशी हे ८६ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी डॉक्टरांची एक टीम कार्यरत होती. बुधवारी त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला होता. वयोमानानुसार त्यांना दीर्घकाळापासून आरोग्याच्या समस्या जाणवत होत्या. शिवाजी पार्क स्मशानभूमीत मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार येणार आहेत. त्यापूर्वी माटुंगा येथील घरी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. मे २०२३ पासून मनोहर जोशी यांची प्रकृती खालावत चालली होती. ब्रेन हॅमरेज मुळे त्यांना अधिकच त्रास जाणवू लागला होता. हिंदुजा हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये त्यांना उपचारासाठी नेण्यात आले होते.
ते काही दिवस अर्ध-चेतनावस्थेत होते. डॉक्टरांना बरे होण्याची चिन्ह दिसली नाहीत म्हणून मग त्यांना शिवाजी पार्कच्या घरी ठेवण्यात आले. तिथेच त्यांच्यावर उपचार चालू होते. १९६४ साली मनोहर जोशी यांनी अनघा जोशी सोबत लग्न केले होते. २०२० मध्ये वृद्धापकाळाने अनघा जोशी यांचे निधन झाले होते. त्यांचा मुलगा उन्मेष जोशी हे आर्किटेक्ट आहेत. मनोहर जोशी यांच्या पश्चात उन्मेष, अस्मिता आणि नम्रता अशी तीन अपत्ये त्यांना आहेत. मनोहर जोशी यांची नात शर्वरी वाघ ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. २ डिसेंबर रोजी मनोहर जोशी यांचा ८६ वा जन्मदिवस साजरा करण्यासाठी त्यांना दादर येथील त्यांच्या कार्यालयात आणण्यात आले होते. त्यांच्या समर्थकांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. २ डिसेंबर १९३७ रोजी महाराष्ट्र , महाड येथे जन्मलेल्या जोशी यांनी मुंबईतील प्रतिष्ठित वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) मधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली होती. जोशी यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मध्ये त्यांच्या सहभागाने झाली आणि नंतर ते शिवसेनेचे सदस्य झाले.
८० च्या दशकात शिवसेनेतील एक प्रमुख नेते म्हणून ते उदयास आले होते. त्यांच्या संघटनात्मक कौशल्यासाठी आणि तळागाळातील संपर्कासाठी ते ओळखले जात होते. मनोहर जोशी यांचा सर्वात महत्त्वाचा राजकीय टप्पा १९९५ मध्ये आला जेव्हा त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शरद पवार यांच्यानंतर राज्यात शिवसेनेची सत्ता आणली होती. ते संसद सदस्य म्हणूनही निवडून आले होते. वाजपेयी सरकार सत्तेवर असताना २००२ ते २००४ या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष होते. मनोहर जोशी यांनी राजकीय वर्तुळात महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. त्यांनी शैक्षणिक संस्था देखील उभारल्या आहेत. मनोहर जोशी यांच्या निधनाने राजकिय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.