धुमधडाका चित्रपटानंतर लोकं त्रास द्यायचे म्हणून चाळच सोडली… लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चाळीतल्या गणपतीचा खास किस्सा
लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेलं एक मोठं व्यक्तिमत्व. त्यांच्या अकाली निधनाने मराठी सृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या अभिनयाचा वारसा मुलगा अभिनय बेर्डे समर्थपणे पुढे नेताना दिसतो आहे. आज्जी बाई जोरात या नाटकातून तो महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. याच नाटकाच्या निमित्ताने त्याने आरपारला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने चाळीतल्या गणपतीची एक खास आठवण शेअर केलेली पाहायला मिळाली. अर्थात अभिनय त्यावेळी जन्मलादेखील नव्हता पण चाळीत लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांची भावंड एकत्र राहायला असायची.
८० च्या दशकातली ही आठवण सांगताना अभिनय म्हणतो की, ” एका पॉईंटनंतर आम्ही मुंबईच्या चाळीतून दुसरीकडे शिफ्ट झालो होतो, कारण लोकं त्रास द्यायची. धुमधडाका चित्रपटानंतर गणपती आले होते. आमच्या घरातल्या गणपतीत साधारण १०० लोकं रोज जेवायला असायची. कारण अनेक कुटुंब एकत्र राहायचे. धुमधडाका रिलीज झाल्यानंतर वडिलांना टाकीवर बसायला लागलं होतं इतकी तिथे गर्दी जमा झाली होती. माझे दोन्ही भाऊ जे अजूनही तिथेच राहतात ते बॅरिगेट्स घेऊन खाली उतरायचे बाबांना खाली गाडीपर्यंत सोडवायला. पण मग एका पॉईंटनंतर त्यांना घर शिफ्ट करावं लागलं. ही खूप आधीची गोष्ट आहे ८० च्या दशकातली तेव्हा मी नव्हतो. पण गणपती मात्र तिथेच असायचा.
आमच्या घरी दीड दिवसाचा त्यानंतर तिकडे पाच दिवसांचा असायचा नंतर तो दीड दिवसांचा केला. पण आमचा गणपती आम्ही थांबवला आणि आता तो फिरता गणपती असतो.” अशी एक गणपतीची खास आठवण अभिनयने यावेळी शेअर केली. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनावेळी अभिनय खूपच लहान होता. पण त्यांच्यासोबतच्या ज्या काही आठवणी आहेत त्या अजूनही एखाद्या अत्तराच्या कुपीप्रमाणे त्याने मनाच्या कोपऱ्यात तशाच जपून ठेवलेल्या आहेत.