गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी त्यांचा नवीन स्टार्टअप सुरू केलेला पाहायला मिळाला. अक्षया देवधर, स्वाती देवल, अनघा अतुल , श्रेया बुगडे , मृणाल दुसानिस, सलील कुलकर्णी अशा सर्व कलाकारांनी कपड्यांचा ब्रँड तसेच हॉटेल व्यवसाय सुरू करून एक नवीन सुरुवात केलेली पाहायला मिळाली. अभिनय क्षेत्र हे बेभरवशाचं असल्याने कलाकारांना हे पर्यायी मार्ग निवडावे लागतात. याच जोडीला आता स्टार प्रवाहच्या लक्ष्मीच्या पावलांनी मालिका अभिनेत्याने स्वतःचा बिजनेस सुरू केला आहे.
लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत ऋत्विक तळवलकर याने सोहम चांदेकरची भूमिका साकारलेली आहे. ऋत्विकने ऑनलाइन कँटीन अर्थात क्लाउड किचन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. “The मिसळ canteen” या नावाने आज २९ डिसेंबर पासून वसंत विहार, ठाणे येथे तो हे क्लाउड कँटीन सुरू करत आहे. या मिसळ कँटीनमधून खवय्यांना मिसळ, दही मिसळ, उपवासाचे पदार्थ, वेगवेगळे थालिपीठं स्वीगी किंवा झोमॅटोवरून ऑनलाइन ऑर्डर करून मागवता येणार आहेत. त्यामुळे ऋत्विकने ठाण्यातील खवय्यांसाठी हा आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
ऋत्विक तळवलकर हा गेली काही वर्षे अभिनय क्षेत्रात काम करत आहे. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत त्याची सकारात्मक भूमिका आहे. याअगोदर कॉलेजच्या नाटकातून तो अभिनेता, दिग्दर्शक म्हणून काम करताना दिसला होता. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. या प्रसिद्धीचा आता फायदा करून घेता यावा म्हणून त्याने स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचे ठरवले. जिथे मराठमोळे पदार्थ खवय्यांना चाखता येतील या हेतूने त्याने हे क्लाउड किचन सुरू केलं आहे. मराठी सेलिब्रिटींनी त्याला या नवीन स्टार्टअपसाठी शुभेच्छा देऊ केल्या आहेत.