आजवर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मराठी सृष्टीला अनेक दमदार चित्रपट दिले आहेत. सैराट हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला असला तरी इतरही त्यांच्या कलाकृतींचे रसिक प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. ‘खाशाबा’ हा त्यांचा आगामी चित्रपट आहे. १डिसेंबर रोजी त्यांनी या चित्रपटसंदर्भात शूटिंग सुरू झाल्याची घोषणा केली होती. खाशाबा जाधव हे कुस्तीपटू आहेत ज्यांनी ऑलम्पिकमध्ये भारताला पहिले विजेतेपद जिंकून दिले होते. त्यांचा हाच जीवनप्रवास उलगडण्याचा प्रयत्न नागराज मंजुळे खाशाबा चित्रपटातून करणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग आता जवळपास पूर्णच झालेले आहे, त्यामुळे चित्रपट कधी प्रदर्शित होतोय याकडे प्रेक्षक डोळे लावून आहेत.
मात्र हा चित्रपट पूर्णत्वास येण्याअगोदरच त्याला आडकाठी आणली आहे. या चित्रपटाची मूळ कथा लेखक संजय दुधाने यांची आहे त्यामुळे आपल्याला न विचारता चित्रपट बनवल्याने एक नवा वाद निर्माण झाला आहे. कोरोनाच्या अगोदरच २०१९ मध्ये नागराज मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांचा मुलगा रणजित जाधव यांच्याशी या चित्रपटाबाबत करार केला होता. पण ३० ऑगस्ट २०१३ रोजी कराड येथे भरलेल्या परिषदेत रणजित जाधव यांनी ही कथा संजय दुधाने यांची असल्याचे स्पष्ट केले होते. रणजित जाधव यांनी चित्रपटाबद्दल परस्पर करार केल्याने संजय दुधाने यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी नागराज मंजुळे यांचीही भेट घेतली होती, आणि सामंजस्याने हा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती केली होती.
पण यासर्भात सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने संजय दुधाने यांनी नागराज मंजुळे यांना कायदेशीर नोटीस पाठवली. त्यानंतर रणजित जाधव यांनी संजय जाधव यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवला होता. त्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये शूटिंगला सुरुवात करण्यात आली. पण आता शूटिंग पूर्ण होत असतानाच संजय दुधाने पुन्हा नाराजी दाखवताना दिसत आहेत. त्यांची नाराजी लक्षात घेता ते न्यायालयाचे दार ठोठावणार अशीच चिन्ह आता दिसत असल्याने खाशाबा चित्रपटावर आडकाठी आली आहे. आता नागराज मंजुळे संजय दुधाने यांची मनधरणी कशी करतात याकडे लक्ष लागून आहे.