कलर्स मराठीकडे स्वतःचा टॉपचा शो असताना फ्लॉप शोची काय गरज…केदार शिंदे बिग बॉसच्या विरोधात?
काहीच दिवसांपूर्वी केदार शिंदे यांनी कलर्स मराठी वाहिनीची जबाबदारी स्वीकारली. ही जबाबदारी स्वीकारताच वाहिनीचे हेड म्हणून त्यांनी नवनवीन धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. ‘इंद्रायणी’ या नव्याने सुरू झालेल्या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर स्पृहा जोशीला घेऊन ते ‘सुख कळले’ ही नवीन मालिका आणत आहेत. याच जोडीला चला हवा येऊ द्या च्या एक्झिट नंतर केदार शिंदे यांनी कलर्स मराठीवर ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ हा नवीन शो दाखल करत असल्याची घोषणा केली. पण प्रेक्षकांनी या शोला तीव्र विरोध दर्शवलेला पाहायला मिळतो आहे. कलर्स मराठीकडे स्वतःचा टॉपचा रिऍलिटी शो असताना या फ्लॉप शोची काय गरज? असा प्रश्नच उपस्थित केला आहे. कलर्स मराठी वाहिनीकडे मराठी बिग बॉस हा टॉपचा शो आहे.
आतापर्यंत या शोचे ४ सिजन पार पडले आहेत. हिंदी बिग बॉसची लोकप्रियता पाहता कलर्स मराठीने त्यांचा मराठी बिग बॉस शो सुरू केला होता. २०१८ मध्ये पहिल्या सिजनला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. गेल्या वर्षी त्याचा चौथा सिजन प्रसारित झाला. पण एक वर्ष होऊनही या शोचा ५ वा सिजन समीर न आल्याने तो कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार? अशी विचारणा होऊ लागली. त्यात आता केदार शिंदे यांनी वाहिनीची धुरा सांभाळल्यानंतर मराठी बिग बॉसला डच्चू दिला की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हसताय ना हसायलाच पाहिजे या शोमधून ते प्रेक्षकांसमोर मनोरंजनाचे एक नवे माध्यम घेऊन येत आहेत. पण प्रेक्षकांना आता चला हवा येऊ द्या च्या शोचा कंटाळा आला आहे. पुन्हा तेच दाखवायचे असेल तर वाहिनीचा टीआरपी कसा वाढेल असा प्रश्न प्रेक्षक त्यांना विचारत आहेत. दरम्यान गेल्या वर्षी मराठी बिग बॉसच्या ४ थ्या सिजनला खूप कमी टीआरपी मिळाला होता. विशेष म्हणजे कमी बजेटमुळे हा शो फ्लॉप होण्यास कारणीभूत ठरला असे बोलले जात होते. त्यात प्रेक्षक देखील या वादग्रस्त शोला ट्रोल करत होते.
सगळं काही ओढून ताणून दाखवण्यापेक्षा हा शो न पाहिलेला बरा अशी टीका त्यावेळी करण्यात येत होती. बिग बॉसचा शो हा स्क्रीप्टेड असतो असे अनेकदा निदर्शनास आले होते. त्याचमुळे केदार शिंदे यांनी हा सारासार विचार करूनच बिग बॉसच्या शोला डच्चू दिला आहे की काय अशी मनात शंका उपस्थित होत आहे. दरम्यान चला हवा येऊ द्या मधून झी मराठी वाहिनीला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. हसताय ना हसायलाच पाहिजे यामधून नवीन काहितरी दाखवता येईल या विचाराने त्यांनी पुन्हा एकदा या कलाकारांसाठी एक मंच उपलब्ध करून दिला आहे. प्रेक्षक या शोला नक्कीच प्रतिसाद देतील हा त्यांना विश्वास असल्यानेच त्यांनी हे धाडस दाखवले आहे. तूर्तास या शोमुळे वाहिनीचा टीआरपी वाढण्यास मदत होईल की नाही हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.