काल ११ फेब्रुवारी रोजी झी मराठीवरील जाऊ बाई गावात या रिऍलिटी शोचे विजेतेपद रमशा फारुकी हिने पटकावले आहे. या शोच्या पहिल्या पर्वाची ती विजेती ठरल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रमशा फारुकी हिला २० लाखांचा धनादेश आणि विजेती ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. रमशा फारुकी ही संयमीत स्पर्धक मानली जात होती. शांत राहून तिने दिलेल्या सगळ्या मोहिमा यशस्वीपणे पार केल्या होत्या. रमशाचा हेअरकट देखील खूप चर्चेचा विषय ठरला होता. गावातल्या कित्येक मुलींनी रमशाकट मारलेला होता. रमशा विजेती झाल्यानंतर शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये तिने गावकऱ्यांचे आभार मानले. खरं तर जाऊ बाई गावात या शोमध्ये येण्यागोदरच रमशा टीव्ही माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली होती. रमशाला मॉडेलिंगची विशेष आवड आहे त्यामुळे तिने अनेक जाहिरातींसाठी मॉडेलिंग केलं आहे.
आज रमशा फारुकी हिने चाहत्यांना आणखीन एक खुशखबर देऊन आश्चर्याचा धक्का दिला आहे. सोशल मीडियावर नुकतीच लाईव्ह येऊन तिने प्रेक्षकांचे आणि गावकऱ्यांचे आभार देखील मानले आहेत. मिळालेल्या रकमेतून तू काय करणार असा सवाल विचारताच ती म्हणाली ” बावधन गावातून मी खूप काही शिकले आहे. पूर्वीची आणि आत्ताची रमशा ह्याच्यात खूप मोठा बदल झाला आहे. ह्याच सर्व श्रेय गावकर्यांना आणि शो ला जातं. २० लाखांची रक्कम हि माझ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे. घरच्या मंडळींसोबत चर्चा केल्यांनंतर आम्ही असं ठरवलं कि मिळालेल्या पैशातील एक मोठी रक्कम मी बावधन गावातील शाळेला दान करावी ज्यामुळे तेथील मुलांना उत्तम शिक्षण घेता येईल” रमशा फारुकी हिच्या ह्या निर्णयामुळे आता तिचे अधिकच कौतुक होताना पाहायला मिळत आहे. पहिल्या पर्वाची विजेती मिळालेल्या रकमेचा चांगला वापर करतेय म्हणून बावधनकर देखील खूष आहेत.
वेल विशर्स, हॅवल्स, झुम मंत्रा, पारस हेल्थ या जाहिरातीत रमशा महत्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. सायना नेहवाल हिच्या परिंदा या बायोपिक मध्ये तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. रमशा ही बॅडमिंटन खेळाडू आहे त्याचमुळे तिला या चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली होती. युअर टर्न चित्रपट, क्राईम पेट्रोल, जरा हटके जरा बचके, नीट की विधायक, झांसी की राणी, तारक मेहता का उलटा चष्मा , तेरा क्या होगा आलिया अशा चित्रपट मालिकांमधून रमशा छोट्या छोट्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. रमशा ही कॉलेजमध्ये आल्यापासून नाटकातून काम करत असे. बॅडमिंटन या खेळात तिने अनेक बक्षिसं देखील मिळवली आहेत. जाहिराती, हिंदी मालिका, चित्रपट अशा माध्यमातून पुढे आलेल्या रमशाला झी मराठीच्या जाऊ बाई गावात या शोने मोठी लोकप्रियता मिळवून दिली. . एक अभिनेत्री, बॅडमिंटन खेळाडू आणि आता मराठी रिऍलिटी शोची विजेती ठरलेल्या रमशाला अल्पावधीतच यशाचा मोठा पल्ला गाठता आला आहे.