थंडीच्या दिवसात खवय्यांना पोपटी पार्टीचे वेध लागलेले असतात. त्यात आता ३१ डिसेंबरची भर पडल्याने ठिक ठिकाणी अशा पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यात बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर हिचीही पोपटी पार्टी जोरात साजरी करण्यात आली. काल जान्हवीने तिच्या कुटुंबासह तसेच मित्र मैत्रिणींसह पोपटी पार्टी साजरी केली. या पोपटी पार्टीचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. जान्हवीने स्वतः पोपटीपार्टीसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव केली. पण एका पत्र्याच्या डब्यात तिने हे लागणारे साहित्य भरल्याने तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
साधारण पोपटी पार्टीसाठी मातीचं मडकं आवश्यक असतं. मातीच्या मडक्यात अंडी, भांबुर्डीचा पाला , वालाच्या शेंगा, बटाटा, चिकन असे वेगवेगळे जिन्नस घातले जातात. आणि ते मडकं चांगलं बांधून आगीत ठेवलं जातं. पण जान्हवीच्या पोपटी पार्टीत तेलाचा पत्र्याचा डब्बा पाहायला मिळाला. या पत्र्याच्या डब्ब्यात सगळे जिन्नस घालताना तिने हा व्हिडीओ शूट केला. पण ही गोष्ट नेटकऱ्यांच्या जेव्हा लक्षात आली तेव्हा जान्हवीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. “अगंबाई पोपटी ह्यात नाही बनवत”…”पत्र्याच्या डब्यात पोपटी बनवत नाहीत, त्यासाठी मातीचं मडकं हवं”..अशा प्रकारच्या तिच्यावर टीका करण्यात येत आहेत.
जान्हवीची ही पोपटी पार्टी पाहून अनेकांनी या व्हिडिओवर प्रशचिन्ह उपस्थित केले आहेत. पत्र्याच्या डब्यात पोपटी शिजवल्याने त्यातले घातक घटक शरीरावर दुष्परिणाम घडवून आणू शकतात असेही मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. तर काहींनी तिची ही पद्धतही आवडली असल्याचे म्हटले आहे.