मी शोला नकार दिला तेव्हा चॅनलची लोकं तिला बघायला हॉस्पिटलमध्ये गेले…हार्दिक जोशीने सांगितला भावुक किस्सा
झी मराठीवरील जाऊ बाई गावात हा शो आता प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवताना दिसत आहे. गेल्या महिनाभरापासून साताऱ्यातील बावधन येथे या शोचे शूटिंग केले जात आहे. शोच्या स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देण्यात येत आहेत. त्यात शेतीची कामं, म्हशीचे दूध काढणे, उसाचा रस विकणे अशी बरीचशी कामं स्पर्धकांना आयुष्यात खूप काही शिकवून गेली आहेत. ४ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या शोच्या स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबियाला भेटण्याची संधी मिळाली. त्यावेळचे हे भावुक क्षण प्रेक्षकांच्याही डोळ्यात पाणी आणताना दिसले. तिथेच हार्दिक जोशीच्या सूत्रसंचालनाचेही अनेकांकडून कौतुक केले जात आहे.
स्पर्धकांना टास्क समजावून सांगणे, वाद झाले तर समज देणे, वेळप्रसंगी स्पर्धकांना त्यांच्या चुका दाखवून देणे अशा गोष्टी हार्दीकने समर्थपणे सांभाळलेल्या आहेत. पण हा शो करण्यासाठी हार्दीकने नकार दिला होता. हार्दीकने याचा खुलासा करताना म्हटले आहे की, हा शो जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा मी नकार दिला होता. माझी वहिनी त्यावेळी खूप आजारी होती. ती मला माझ्या आई, बहीण, मैत्रिणीसारखी होती. आजवर मी जे काही नाव कामावलंय त्याची ती साक्षीदार होती. कुठलंही काम करण्यासाठी तिने मला भरपूर पाठिंबा दिला होता. मी घरातून बाहेर पडताना तिच्या पाया पडायचो तेव्हा तिचा हात माझ्या डोक्यावर असायचा. ती जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा तिची अवस्था खूप नाजूक होती.
काही बरं वाईट होणार याची मला कल्पना होती. या दिवसात मला तिच्यासोबत राहायचं होतं. त्यामुळे मी हा शो करण्यासाठी नकार दिला होता. पण तिला हे समजलं होतं. कारण चॅनलची लोकं त्यावेळी हॉस्पिटलमध्ये आली होती. मी शो का नाकारतोय हे त्यांना समजले होते. मी शो नाकारतोय याची कल्पना तिलाही आली तेव्हा तिनेच मला हा शो तू करायचाच असे सांगितले होते. तिच्याच वाढदिवसाच्या दिवशी या शोचा पहिला एपिसोड टेलिकास्ट करण्यात आला होता. असे म्हणत हार्दिक वहिनीच्या आठवणीत पुन्हा एकदा भावुक झालेला पाहायला मिळाला.