‘आयुष्य हे क्षणभंगुर आहे. आयुष्याच्या सिनेमाला रिटेक घेता येत नाही किंवा रिव्हर्स घेता येत नाही. आयुष्य खूप छोटे व सुंदर आहे. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा’ , असा सल्ला प्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे आपल्या व्याख्यानातून देत असतात. नगर जिल्ह्यातील पारगाव भातोडी हे त्यांचं मूळ गाव. गणेश शिंदे यांना विवांना विविध ठिकाणाहून व्यख्यान देण्यासाठी आमंत्रित केले जाते. शाळेतल्या मुलांना, त्यांच्या पालकांना, तरुणांना देखील त्यांनी आपल्या व्याख्यानातून वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे. त्यांचं मूळ गाव पारगाव भातोडी असलं तरी सध्या ते केडगाव येथे राहतात. वयाच्या १५ व्या वर्षी टाकळी ढोकेश्वर येथे ‘शिवाजी महाराज’ या विषयावर त्यांनी पहिले व्याख्यान दिले होते. हे व्याख्यान तासभर श्रोत्यांना एका जागेवर खिळवून ठेवताना दिसले.
तेव्हापासून ते व्याख्यान देण्यात रमत गेले. पुढे एमबीए झाल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेत तीन महिने त्यांनी शासकीय नोकरी केली. परंतु नोकरीत फारसे मन रमेना म्हणून तीन महिन्यांनंतर त्यांनी या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि व्याख्यान देण्याचे काम सुरू केले. आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रासह अन्य राज्यात १ हजारहुन अधिक व्याख्याने दिली आहेत. संत चरित्र, शिव चरित्र अशा विविध विषयांवरील त्यांची व्याख्यानं गाजली आहेत. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी ‘सुख’ हे पुस्तक लिहिले होते. ‘जाणता राजा शिवछत्रपती’, ‘शिक्षण व्यवस्था काल आज आणि उद्या’, ‘तरुणांपुढील आव्हाने’, ‘संत ज्ञानेश्वर चरित्र’, ‘जगण्यात मौज आहे’ , ‘ सुख म्हणजे तरी नेमके काय’ या विषयांवरील व्याख्यानं खूप लोकप्रिय झाली आहेत. प्रा गणेश शिंदे यांची पत्नी देखील प्रसिद्ध गायिका आहे. सूर नवा ध्यास नवा या शोच्या विजेत्या गायिका सन्मिता धापटे या गणेश शिंदे यांच्या पांच्या पत्नी. २४ जानेवारी २०१५ रोजी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासूनच सन्मिताला गाण्याची आवड होती.
तिचे बालपण आणि शिक्षण पुण्यातच झाले. सन्मिताचे वडील सुनील धापटे हे बीएस्सी पदवीधर तसेच इतिहास विषयातून त्यांनी पीएचडी मिळवली आहे. त्यानंतर ते शासकीय नोकरीत रुजू झाले. त्यामुळे सन्मिताचे बालपण सर्व सुखसुविधांनी परिपुर्ण होते. लहानपणापासूनच तिने गाण्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली, लग्नानंतरही तिने आपली ही आवड जोपासलेली पाहायला मिळाली. सूर नवा ध्यास नवा या शोमुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर मानाची कट्यार मिळवून महागायिका बनण्याचा मान तिने पटकावला. आजवर विविध मंचावर सन्मिताला गायिका म्हणून आमंत्रित केले जाते. सन्मिता आणि गणेश हे दोघेही एकमेकांना अनुरूप आहेत. दोघेही अतिशय समंजस असल्याने त्यांना सुखी जीवनाचे खरे गमक गवसले आहे हे त्यांच्याकडे पाहून जाणवते. आपल्या गावासाठी, गावातल्या मुलांसाठी काहीतरी करण्याची तळमळ प्रा गणेश शिंदे यांच्यात कायम दिसते त्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत राहतात. नगर जिल्ह्यातील हे दोन रत्न महाराष्ट्रभर आपले नाव गाजवत आहेत हे नगकरांसाठी मात्र अभिमानाची गोष्ट ठरली आहे.