चित्रपट निर्माता बनला हॉटेल व्यावसायिक… पुण्यातील प्रसिद्ध शौर्यवाडा हॉटेल मालकाची अशी आहे रिअल लाईफ स्टोरी
तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर शिक्षण आणि नोकरी अशा साचेबद्ध चौकटीत न अडकता व्यवसायाचा मार्ग अवलंबला पाहिजे. कलाकार मंडळी देखील सध्या अशाच गोष्टींचा विचार करू लागले आहेत. ‘कागर’, ‘८ दोन ७५’ या चित्रपटाचे निर्माते विकास नाना हांडे यांनीही हॉटेल व्यवसायाची वाट धरली आहे. पुण्यात त्यांनी “शौर्यवाडा” नावाने एक दोन नव्हे तर तब्बल ७ हॉटेल्सचा ब्रँड उभारला आहे आणि अजून ४ हॉटेल्सचे काम प्रगतीपथावर आहे. पुण्यात हांडेवाडी, सासवड, वाघोली, उरळी कांचन, नगर, उमरगा, लोणावळा या भागात सध्या शौर्यवाडा च्या शाखा आहेत. एखादा हॉटेल व्यवसाय करायचा म्हटलं की त्यातील बारकावे समजून घेणं , जेवणाची चव राखणं आणि अतिथी देवो भव म्हणत खवय्यांचे स्वागत करणं तितकंच गरजेचं आहे. याच गोष्टींचा विचार करून विकास हांडे यांनी स्वतःच्या नावाची ओळख जपली आहे. विकास हांडे यांचे वडील नाना हांडे यांनी पुण्यातील हांडेवाडी येथे छोटासा हॉटेल व्यवसाय सुरू केला होता.
पण त्या हॉटेलचे विस्तारित रूप करून विकास हांडे यांनी त्यांचा हा व्यवसाय प्रगतीपथावर नेला. औताडे हांडेवाडी गावचे उपसरपंच म्हणून त्यांनी पदभार सांभाळलेला आहे. दोन चित्रपटांची निर्मिती करून त्यांनी कला क्षेत्रातही पाऊल टाकले. पण त्यानंतर त्यांनी हॉटेल व्यवसायात लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. स्वतःचा काही ब्रँड असावा या हेतूने त्यांनी ‘चिकन रान’, ‘मटण रान’ अशा नाविन्यपूर्ण कन्सेप्ट उपलब्ध करून दिल्या. यामुळे त्यांच्या शौर्यवाडा हॉटेलमध्ये दररोज शोकडो खवय्यांची गर्दी उसळत असते. कधीकधी तर अलोट गर्दीमुळे खवय्यांना टेबल मिळवण्यासाठी वाट पाहावी लागते. नावाप्रमाणेच त्यांनी शौर्यवाड्याला वाड्याचे रूप दिलेले आहे. अस्सल तुपामध्ये चिकन रान आणि मटण रान बनवल्यामुळे इथल्या पदार्थांची चव तुमच्या जिभेवर रेंगाळते त्यामुळे वारंवार भेट देणारे खवय्ये तुम्हाला इथे नक्कीच सापडतील.
नॉन व्हेज प्रेमींच्या आग्रहाखातर त्यांनी आता चिकन बिर्याणी देखील बनवण्यास सुरुवात केली आहे. एवढंच नाही तर व्हेज खवय्यांसाठी त्यांनी शौर्यवाडा व्हेज हॉटेल देखील सुरू केलेले आहे. जिथे खवय्यांना पुरणपोळी, आणि आमरासाची चव चाखता येणे शक्य झाले आहे. विकास हांडे यांनी केवळ हॉटेल व्यवसायात न उतरता आता त्यांनी पर्यटकांना राहण्याची उत्तम सोय करून दिली आहे. तसेच छोट्या मोठ्या समारंभासाठी हॉल उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस विकास हांडे यांचा व्यवसाय वृद्धिंगत होताना दिसत आहे. उपसरपंच, चित्रपट निर्माता आणि हॉटेल शौर्यवाडा ब्रँडचे मालक अशी त्यांची ओळख बनली आहे.