पहिल्याच दिवशी कवट्यामहाकाळ साकारताना गुजराथी ऍक्टरने नखरे दाखवले मग … प्रिया बेर्डे यांनी सांगितला महेश कोठारेंनी त्याला शिकवलेला धडा
महेश कोठारे यांनी ९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना दिले. त्यातील एक गाजलेला चित्रपट म्हणजे “धडाकेबाज”. १९९० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. खलनायकी पात्रांच्या विशिष्ट नावाने आजही हा चित्रपट ओळखला जातो. ‘कवट्यामहाकाळ’ हे या चित्रपटाच्या खलनायकाचे नाव. ही भूमिका साकारणारा कलाकार कोण? हा प्रश्न कित्येकांना पडलेला असतो कारण त्या खलनायकाचा चेहरा चित्रपटात कुठेच दिसत नसतो. खरं तर या मागे एक मोठं कारण दडलेलं आहे. आज यामागचे खरे कारण काय आहे ते जाणून घेऊयात.
कवट्यामहाकाळ ही भूमिका एका विशिष्ट मुखवट्यामागे दडवलेली आहे. मध्यंतरी ही भूमिका तब्बल ८ जणांनी साकारली असल्याचे संगीतले जात होते. पण यामागचे खरे कारण प्रिया बेर्डे यांनी समोर आणून दिले. ही भूमिका अगोदर एका गुजराथी नटाला देण्यात आली होती. पण शूटिंगच्या पहिल्याच दिवशी त्या नटाने नखरे दाखवण्यास सुरुवात केली. हा गुजराथी नट म्हणजेच अभिनेता ‘चंद्रकांत पंड्या’ होय. चंद्रकांत पंड्या यांनी ‘रामायण’ मालिकेत निषादराजची भूमिका साकारली होती. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. धडाकेबाज चित्रपटाचा नायक बनण्याची त्यांना संधी मिळाली पण त्यांचे सेटवर नखरे एवढे वाढले की महेश कोठारे यांनी त्यांना धडा शिकवण्याचे ठरवले. समोरून कुठल्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याने महेश कोठारे यांनी चित्रपटात त्यांचा चेहराच कुठे दिसू दिला नाही.
ही काळजी घेतल्यानंतर त्यांच्या भूमिकेचे डबिंग बिपीन वर्टी यांना देण्यात आले. बिपीन वर्टी यांनी महेश कोठारे यांच्या चित्रपटात अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सचिन पिळगावकर यांचे ते आत्येभाऊ होत. अशी ही बनवाबनवी, दे दणादण, झपाटलेला, आमच्यासारखे आम्हीच, एक गाडी बाकी अनाडी, फेका फेकी, गंमत जंमत, माफीचा साक्षीदार, माझा पती करोडपती, धुमधडाका, डॉक्टर डॉक्टर अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात ते झळकले होते. बिपीन वर्टी यांनी ‘चंगु मंगु’ ,’खरा वारसदार’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. याचदरम्यान बिपीन वर्टी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले असल्याचे बोलले जाते.