वडिलांचे निधन झालं एकाएकी श्रीमंतीतून… परिस्थिती इतकी बिकट झाली कि काम करून मिळतील त्या पैशात पाव आणि कांदा
थरथराट, दे दणादण, एक गाडी बाकी अनाडी, अग्निपथ, धडाकेबाज, हम, वंश, तिरंगा, व्हेंटिलेटर या आणि अशा कितीतरी हिंदी मराठी चित्रपटातून आपल्या जबरदस्त अभिनयाने खलनायक तसेच सहाय्यक भूमिका रंगवणाऱ्या दीपक शिर्के यांच्या प्रवासाबद्दल खूप कमी जणांना माहीत आहे. त्यांच्या याच अपरिचित प्रवासाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. दीपक शिर्के यांचा जन्म २९ एप्रिल १९५५ रोजी मुंबईतील गिरगावातील चिरा बाजार येथे झाला. घरी आर्थिक सुबत्ता असल्याने दीपक शिर्के यांचे बालपण अतिशय मजेत गेले होते. मात्र वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे घरची परिस्थिती बिकट झाली. घराचे छप्पर हरवते तशी त्यांची अवस्था झाली होती. एकाएकी श्रीमंतीतून त्यांनी अगदी विरुद्ध दिशा अनुभवली होती. मोठा मुलगा म्हणून लहानपणीच त्यांच्या खांद्यावर जबाबदारी आली. जवळपास दीड वर्ष घरी वाल सोलून देण्याचे काम करत असताना त्यातून जे पैसे मिळतील त्या पैशात पाव आणून त्याच्यासोबत कांदा खाऊन त्यांनी दिवस काढले होते.
पुढे आईला शाळेत नोकरी लागली त्यामुळे पाच मुलांच्या खाण्याची सोय झाली. आर्थिक हातभार लागावा म्हणून त्यांनी घरगुती व्यवसाय सुरू केले. दीपक शिर्के यांचे शाळेत फारसे मन रमले नाही. पण शाळेत होणाऱ्या नाटकाच्या तालमीला ते हजर राहायचे. यातूनच नाटकाची आवड निर्माण झाली. साहित्य संघाच्या नाटकातून त्यांना छोट्या मोठ्या भूमिका मिळत गेल्या. पण पुढे काम मिळवताना कुठल्याही भूमिकेत ते फिट बसत नसल्याचे कारण देण्यात येऊ लागले. मग मिळेल त्या भूमिका करण्याचे त्यांनी ठरवले. ‘टूरटूर’ या नाटकामुळे लक्ष्मीकांत बेर्डे सोबत त्यांची चांगली ओळख झाली होती. लक्ष्मीकांत यांनीच पुढे मला मराठी चित्रपटातून काम मिळवून दिले ‘ही त्याचीच मेहरबानी’ असे दीपक शिर्के आवर्जून सांगतात.
धिप्पाड शरीरयष्टीमुळे सुरुवातीला खलनायकाच्या भूमिका मिळाल्या. इरसाल कार्टी हा त्यांनी अभिनित केलेला पहिला मराठी चित्रपट. एक शून्य शून्य या मालिकेमुळे दीपक शिर्के प्रचंड लोकप्रिय झाले. आक्रोश या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. तिरंगा चित्रपटातील गेंडा स्वामी, अग्निपथ मधील अण्णा शेट्टी, कालिया अशा खलनायकी ढंगाच्या भूमिका त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत अजरामर केल्या. दीपक शिर्के यांना कठीण काळात पत्नीची भक्कम साथ मिळाली. त्यांच्या पत्नी गार्गी शिर्के या पीएचडी धारक आहेत. त्यामुळे संसाराला आर्थिक हातभार लागला .मध्ये बऱ्याच काळापासून ते अभिनय क्षेत्रापासून दूर राहिले. अभिनय क्षेत्रात कसलेला हा कलाकार पुन्हा प्रेक्षकांसमोर दाखल होवो हीच सदिच्छा.