२००८ साली दे धक्का चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर, शिवाजी साटम, सक्षम कुलकर्णी, संजय खापरे, हृषीकेश जोशी असे बरेचसे कलाकार झळकले होते. सायली डान्स कॉम्पिटीशनमध्ये पोहोचावी यासाठी त्यांच्या गाडीला शेवटपर्यंत दे धक्का सुरू होता. २००८ नंतर २०२२ मध्ये महेश मांजरेकर यांनी दे धक्का २ प्रेक्षकांच्या भेटीला आणला. पण यात सायलीच्या जागी गौरी इंगवलेला संधी देण्यात आली. त्यामुळे दे धक्का मधली चिमुरडी कुठे गायब झाली असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला.
कारण या चित्रपटानंतर ही भूमिका साकारणारी बालकलाकार जणू इंडस्ट्रीतून गायबच झाल्याचे दिसून आले. ही बालकलाकार म्हणजे ” गौरी वैद्य” होय. गौरी वैद्य तिचं शिक्षण पूर्ण करत असल्याने ती दे धक्का २ मध्ये दिसणार नाही असं उत्तर महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत दिलं होतं. गौरी वैद्य हिने अल्फा मराठीच्या इंद्रधनुष्य या मालिकेत बालकलाकार म्हणून काम केले होते. वयाच्या ८ व्या वर्षीच ती टीव्ही मालिकेत झळकली होती. त्यानंतर तिला दे धक्का चित्रपटाने मोठी लोकप्रियता मिळवून दिली.
मधल्या काळात गौरीने अंधा उंट, शिक्षणाच्या आईचा घो, भाऊ माझा पाठीराख अशा चित्रपटातून बालकलाकार म्हणून काम केले. पण त्यानंतर मात्र गौरी इंडस्ट्रीपासून दूर राहिली. या काळात तिने तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले शिवाय कथ्थकचेही तिने धडे गिरवले. गौरी पुन्हा या इंडस्ट्रीत कम बॅक करायला नक्कीच तयार असेल. पण त्यासाठी योग्य संधीची ती वाट पाहत आहे.