पत्नीला ट्रोल केलं जातंय तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातोय…शिवरायांची माफी मागत चिन्मय मांडलेकरने घेतला महत्वाचा निर्णय
काल अभिनेता चिन्मय मांडलेकर याची पत्नी नेहा हिने सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. आमच्या ११ वर्षाच्या मुलाला त्याच्या नावावरून ट्रोल केलं जातंय आणि आम्हाला देश सोडून जाण्याचा सल्ला दिला जातोय हे पाहून नेहा जोशी मांडलेकर हिने तिचं मत व्यक्त केलं होतं. यानंतरही त्यांना ट्रोल केलं जात असल्याने आता स्वतः चिन्मय मांडलेकर याने ‘ इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नसल्याचे’ स्पष्ट केले आहे. माझा ११ वर्षांचा मुलगा त्याचं नाव जहांगीर आहे या नावावरून त्याला माझ्या पत्नीला ट्रोल केलं जातंय, तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातोय, यामुळे आमच्या माझ्या कुटुंबाचं मानसिक संतुलन बिघडतंय आणि म्हणूनच मी आता इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही…असे चिन्मय मांडलेकरने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्यामुळे माझ्या मुलाला जर ट्रोल केलं जात असेल तर मी ही भूमिका करणार नाही. जर आम्हाला देश सोडून जा म्हणत असतील तर या गोष्टीवर न बोललेलंच बरं अशीही एक ठोस प्रतिक्रिया त्याने यावर दिली आहे. दरम्यान चिन्मय मांडलेकर यांनी या ट्रोल करणाऱ्यांना जहांगीर आर्ट गॅलरीचं नाव बदलणार का?. जहांगीर टाटा यांच्या वस्तू खरेदी करणं बंद करणार का? असाही प्रश्न उपस्थित केला आहे. मी जवळपास सहा चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. माझा मुलगा २०१३ मध्ये जन्मला त्यावेळी ११ वर्षांपूर्वी आम्ही त्याचं नाव जहांगीर ठेवलं होतं. पण ही भूमिका साकारल्याने माझ्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास दिला जात आहे.
काहीजण तर म्हणतायत की तुम्ही एका विशिष्ट राजकीय पक्षाची बाजू मांडता मग आता तुमच्याबद्दल असच बोललं जाणार. पण मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार केलेला नाही त्यांची बाजू मांडलेली नाही, उलट ज्या पॉडकास्टला मी मुलाखत दिली तिथेही मी असच म्हटलं आहे की मी दरवेळी मतदान करताना वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवाराला मत देत असतो. पण तरीही जर मला व माझ्या ११ वर्षांच्या मुलाला ट्रोल केलं जात असेल, मी महाराजांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत नसेल तर इथून पुढे मी महाराजांची माफी मागून सांगतो की मी ही भूमिका करणार नाही.