कलर्स मराठीवरील मराठी बिग बॉसचा ५ वा सिजन जोरदार चर्चेत आला आहे. कारण १०० दिवसांचा बिग बॉस आता अवघ्या ७० दिवसातच गुंडाळणार असे चित्र पाहायला मिळत आहे. नुकताच मराठी बिग बॉसचा ५३ वा एपिसोड प्रेक्षकांसमोर आलेला आहे. पण आता वाईल्ड कार्ड एन्ट्री नंतर मराठी बिग बॉसला म्हणावा तसा टीआरपी गाठता आला नाही असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. संग्राम चौगुले हा वाईल्ड कार्ड एन्ट्री करताना दिसला मात्र अरबाजपुढे त्याची खेळी कमी पडलेली दिसली. परवाच्या टास्कमध्ये तर संग्रामच्या हाताला फ्रॅक्चर झाले. यामुळे संग्राम खेळापासून दूर राहणार असेच चित्र दिसत आहे.
दरम्यान आता बिग बॉसचा ५ वा सिजन लवकरच संपवणार असल्याचे दिसून येते कारण आज बिग बॉसच्या घरात पत्रकारांना आमंत्रित करण्यात आलं आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना या सदस्यांना उत्तरं द्यावी लागणार आहेत. खरं तर बिग बॉसमध्ये येणारे पत्रकार हे शेवट शेवट हजेरी लावत असतात. पण अवघ्या ५४ व्या दिवशीच बिग बॉसने पत्रकारांना आमंत्रित केलेलं पाहायला मिळत आहे. शिवाय डॉ निलेश साबळे हाही सदस्यांना त्याच्या पध्द्तीने इंजेक्शन टोचणार आहे. महत्वाचं म्हणजे मराठी बिग बॉसचा ५ वा सिजन ७० दिवसात गुंडाळण्याचे आणखी एक कारण समोर आलेलं आहे. येत्या ३ ऑक्टोबर पासून कलर्स मराठीवर “आई तुळजाभवानी” ही मालिका प्रसारित केली जाणार आहे.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर या मालिकेची गाथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेमुळेच कलर्स मराठी बिग बॉसचा गाशा गुंडाळतेय हे आता स्पष्ट होताना दिसत आहे. त्यामुळे बिग बॉसमधून एकापाठोपाठ एक सदस्यांची एक्झिट होत आहे. एकाच आठवड्यात दोन सदस्य बाहेर पडणारी ही दुसरी वेळ होती. आता राहिलेल्या १० सदस्यांमधून ५ सदस्य लवकरच बाहेर काढण्यात येतील असे या शोबाबत बोललं जात आहे.