म्हणून मी बिग बॉसमध्ये यायला तयार नव्हते….मराठी माणसांबद्दल निक्की तांबोळीचं वादग्रस्त वक्तव्य
२८ जुलै पासून मराठी बिग बॉसच्या ५ व्या सिजनला सुरुवात झाली आणि सगळीकडे बिग बॉसचीच चर्चा पाहायला मिळाली. पहिल्याच दिवशी निक्की तंबोळीने वर्षा उसगावकर यांच्यासोबत वाद घातला तेव्हाच प्रेक्षकांना निक्की तांबोळीच्या खेळीचा अंदाज आलेला होता. पण यानंतरही निक्की तंबोळीचे वर्षा उसगावकर, अंकिता वालावलकर सोबत वाद झालेले दिसले. निक्की बेडवर बसली म्हणून सुरजने ही तक्रार वर्षा उसगावकर यांच्याजवळ बोलून दाखवली तेव्हा निक्की तांबोळीने सुरजलाच धारेवर धरलेले पाहायला मिळाले. यामुळे साधासुधा सूरज चांगलाच बिथरला, सुरजचा हा साधेपणा पाहून प्रेक्षकांनाही त्याच्यावर दया आली.
त्याची ही उडालेली घाबरगुंडी पाहून बिग बॉसनेच त्याच्याशी सुसंवाद साधला आणि परिस्थितीशी लढण्याचे बळ दिले. तर इकडे आर्या जाधव मात्र निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलच्या खेळीवर आगपाखड करण्यास सुरुवात करू लागली. अंड्यावरून हे भांडण पुढे जाऊन आर्याने निक्कीला ‘संस्कृती न पळणारी पागल मुलगी’ अशा शब्दांत तिची बोलती बंद केली. अरबाज आणि निक्की यांच्यात काहीतरी सुरू आहे असा आर्याचा यातूनच सुचवण्याचा प्रयत्न होता. तेव्हा मात्र निक्कीने बिग बॉसच्या घरात न येण्याचे कारणच सांगून टाकले.
“म्हणून मी मराठी बिग बॉसच्या घरात येत नव्हते. कारण या लोकांची मेंटेलिटी मॅच होणार नाही”. असे म्हणत निक्की तांबोळीने मराठी माणसांची मेंटेलिटी काढली. तिचे हे विधान आता चांगलेच वादग्रस्त ठरू लागले आहे. किमान नॅशनल टीव्ही समोर तरी माणसांनी आपली संस्कृती जपावी या उद्देशाने आर्याने निक्कीला सुनावले होते. पण निक्कीने मात्र मराठी माणसांची मेंटेलिटीवरच आक्षेप घेतला. एक मुलगी आणि एक मुलगा जवळ आले की त्यांच्यात प्रेम असतं ही मेंटेलिटी मराठी माणसांमध्ये आहे याची आठवण निक्कीने करून दिली. त्यामुळे निक्की तांबोळीचं हे वादग्रस्त विधान सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.