मराठी इंडस्ट्रीत लग्न करून विभक्त झालेल्या बऱ्याचशा अभिनेत्री आहेत. आयुष्यात पुरुष असणं म्हणजेच आपलं आयुष्य पूर्णत्वास येतं असं मुळीच नाही हे या अभिनेत्रींनी दाखवून दिलं आहे. आणि यात आम्ही खुश आहोत असेही त्या म्हणताना दिसत आहेत. काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनेही पुन्हा लग्न करणार नाही असे स्पष्ट शब्दांत म्हटले होते. मी या इंडस्ट्रीत काम करते, माझा परिवार सांभाळते, मी निर्माती देखील आहे मग फक्त आयुष्यात पुरुष नाही म्हणून माझे आयुष्य पूर्णत्वास येत असे मुळीच नाही हे तिने स्पष्ट शब्दांत म्हटले होते. तेजस्विनी पाठोपाठ आता अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिनेही ‘ मी सिंगल आहे आणि खुश आहे’ असे म्हटले आहे.
भार्गवी चिरमुले ही अभिनेत्री असण्यासोबतच उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे. काही दिवसांपूर्वीच तिने स्वतःचा युट्युब चॅनल सुरू केला. यासोबतच ती योगा थेरपिस्ट देखील आहे. भार्गवीने मीडिया टॉक मराठीला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ती आपल्या अभिनय क्षेत्र आणि योगा थेरपिस्ट ते युट्युबर बनण्याचा प्रवास कसा होता याबद्दल सांगते. भार्गवीचे लग्न मार्केट हेड असलेल्या पंकज एकबोटे यांच्याशी झाले होते. खान्देशातील भुसावळ मधील डॉ प्रकाश एकबोटे यांचे ते चिरंजीव होत. पण लग्नानंतर काही वर्षांतच भार्गवीने पंकज पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. “मागे वळून पाहताना आता मला वाटतंय की ठीक आहे यार मी सिंगल आहे म्हणून काय झाले मी तर खुश आहे , मी आजवर कोणालाही त्रास दिलेला नाही. बाबा गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी शूटिंगला गेले होते. माझ्या भोवती सगळं छान चाललंय, मी सिंगल आहे आणि यात मी खूप खुश आहे.
मला हवं तसं मी काम करत आहे, मला हवं तसं जगता येतंय, मागे वळून बघते तेव्हा इतका मोठा समुद्र पार केलाय. आता पुढे तर काहीच नाहीये त्यामुळे मला आता कशाचीच भीती वाटत नाहीये.” असे भार्गवी तिच्या सिंगल असण्यावर बिनधास्तपणे बोलते. भार्गवीचा योगा थेरपीवर प्रचंड विश्वास आहे. योगा हा कुठलाही व्यायामाचा प्रकार नाही ती तुमच्या जगण्याची शैली आहे असे ती सांगते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही झुंबा करता हे केल्याने तुमचे गुडघे जातात, पाठीचा त्रास सुरू होतो. योगामुळे वजन लवकर कमी होत नाही पण शरीराला एक प्रकारची व्यायामाने सवय करून घ्यावी लागते. सेल्फ लव्ह असलं की तुम्ही तुमच्या आयुष्यावर प्रेम करता. जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती असली की तुम्ही तुमच्या आहाराकडे, व्यायामकडे लक्ष देता, त्यावरच तुमची दिनचर्या ठरलेली असते असे ती म्हणते.