भाडीपा मधील ह्या फूड ब्लॉगर ओळखलंत? विश्वास बसणार नाही पण हाच तो ज्याने लहानपणी मराठी मालिका गाजवल्यात

आजवर लहान मुलांवर आधारित खूप कमी मराठी मालिका बनलेल्या पाहायला मिळतात. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून अशा काही मोजक्या कलाकृती घडल्या. त्यातीलच एक म्हणजे ‘दे धमाल’. अल्फा मराठी म्हणजेच आताची झी मराठी या वाहिनीवर लहानग्यांसाठी हा कार्यक्रम सादर होत होता. या कार्यक्रमात मुलांचे दोन गट पाहायला मिळाले. त्यातील एक हुशार गट आणि दुसरा म्हणजे मस्तीखोर मुलांचा गट. या मालिकेतील बरेचसे चेहरे आता मराठी सृष्टीत नाव कमावताना दिसत आहेत.
अर्थात प्रिया बापट, स्पृहा जोशी, दुष्यंत वाघ हे चेहरे प्रेक्षकांना चांगलेच परिचयाचे आहेत. मात्र यातील आणखीही चेहरे या मालिकेमुळे पुढे आलेले पहायला मिळतात. याच चांडाळ चौकडीचा एक सदस्य म्हणजेच अमेय सध्या युट्युब चॅनलवर फूड ब्लॉगर म्हणून लोकप्रियता मिळवत आहे. होय अमेय कदम हाच तो मुलगा आहे ज्याने दे धमाल मालिकेत अमेयचेच पात्र साकारले होते. अमेयने कलाक्षेत्रात येण्यासाठी मोठे प्रयत्न केले. शिक्षक, कॉमेडियन, सिनेमॅटोग्राफर, फोटोग्राफर ते अगदी रोडीज ७ मध्येही त्याने नशीब आजमावले. भाडिपा या डिजिटल वाहिनीचा तो क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे.

याच सोशल वाहिनीवर त्याचा फूड ब्लॉग देखील पाहायला मिळतो. मराठी सृष्टीतील कलाकारांचं प्रोजेक्ट प्रमोशन असो किंवा सोशल मीडिया स्टार्सच्या घरी जाऊन जेवणं असो हे त्याने व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. अमेय कुठे काय करतो? अशी त्याची टॅगलाईन जरी असली तरी तो काय काय नाही करत हे त्याच्या एकंदरीत प्रवासातून जाणवतं. या यशस्वी प्रवासासाठी अमेय कदमला मनःपूर्वक शुभेच्छा!.