कलाकार म्हटलं की दिवसरात्र शूटिंग करत राहणं, नाटकांचे दौरे करणं , वेळी यावेळी जेवण या गोष्टी आल्याच. पण यामुळे तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतो. असेच काहीसे ठिपक्यांची रांगोळी मालिका फेम कुक्की म्हणजेच अभिनेते अतुल तोडणकर यांच्या बाबतीत घडले आहे. अतुल तोडणकर यांना ब्रेन हॅमरेजचे निदान झाले आहे. याबद्दल माहिती देताना ते म्हणतात की, “हि पोस्ट शेअर करण्यामागे खास कारण आहे.. बरेचदा आपल्या आजारपणाची योग्य आणि उत्तम ट्रीटमेंट कुठे मिळेल हे माहित नसतं आणि एकदा का वेळ निघून गेली की आपल्या हाती काहीही उरत नाही, म्हणून हा पोस्ट प्रपंच.. माझे दोन वाढदिवस आहेत. एक जन्मदिवस आणि दुसरा पुनर्जन्म दिवस.. नाटक – मालिका – सिनेमा या तीनही क्षेत्रात उत्तम काम चालू होतं.. आणि अचानक 21 जानेवारी 2024 ला ” एका लग्नाची पुढची गोष्ट ” या नाटकाच्या पुण्याच्या प्रयोगादरम्यान मला शारीरिक अस्वासथ्याला सामोरं जावं लागलं, ब्रेन हॅमरेज झालं..सगळं थांबलं आणि जवळपास सगळं संपल्याची जाणीव झाली.
परमेश्वराची कृपा, आईवडील, बायको- मुलगा, सर्व रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आणि योग्य वेळेत मिळालेल्या उपचारामुळे यातून ठणठणीत बरा झालो. पण त्याकरता 6-7 महिने पूर्ण आराम आणि उपचार घ्यावे लागले आणि सर्वात महत्वाचे…सर्वोत्तम उपचार मिळाले. आमच्या चंदेरी दुनियेत काम करताना अवेळी जेवण, कामाच्या मोकाट वेळा, अपुरी झोप व आराम यामुळे तुमची शरीर प्रकृती आतून पोखरत जाते आणि असा अचानक विस्फोट होतो जो दुर्दैवाने माझ्या बाबतीत झाला.” अतुल तोडणकर पुढे असेही म्हणतात की, “आम्ही सगळेच कलावंत आपापली काळजी घेत असतोच. जिम, योगा, मेडिटेशन, स्किन आणि केसांची काळजी घेत असतोच पण अंतर्गत शरीर स्वच्छता करायचं विसरतो. मी 7 दिवसात माझ्या शरीराची अंतर्गत स्वच्छता करून आलो. आणि माझी प्रकृती कमालीची सुधारलीय.. वर्षातून किमान 7 दिवस तरी स्वतःच्या तब्येतीसाठी द्यायचेच”.
ठिपक्यांची रांगोळी ही मालिका संपल्यानंतर अतुल तोडणकर कुठेच दिसत नव्हते. एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटकही त्यांनी मध्येच सोडल होतं. त्यामुळे ते नेमके कुठे गेले आहेत? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. माझ्यावर उपचार सुरू झाले तेव्हा पुढील दहाएक महिने पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल असं मला सांगण्यात आलं. इतके दिवस काहीही न करता बसून राहाणं मला शक्य नव्हतं; तशी सवयही नव्हती. पण पूर्णपणे बरं होऊन पुन्हा उभं राहण्यासाठी मला ते करावं लागणार होतं. मी ते केलंही. पैशांची बचत आणि गुंतवणुकीच्या सवयीमुळे उपचारांचा आणि घरातील इतर खर्चाचं नियोजन करता आलं असे ते सांगतात.