“लक्ष्या साडी नेसून तयार, विजू सीनसाठी तयार….” सारखं सारखं त्याच झाडावर काय? डायलॉगमागचा किस्सा
अशी ही बनवाबनवी या चित्रपटासोबत त्याचे डायलॉगही अजरामर झालेत असे म्हणायला हरकत नाही. कारण प्रेक्षकांना या चित्रपटाचे डायलॉग अगदी तोंडपाठ झालेले आहेत. धनंजय माने इथेच राहतात का?..७० रुपये वारले…हा माझा बायको पार्वती…सारखं सारखं त्याच झाडावर काय?…हे आणि असे कितीतरी डायलॉग चित्रपटाची ओळख वेगळी ओळख बनले आहेत. नवरा माझा नवसाचा या चित्रपटाच्या निमित्ताने सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांनी या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी या डायलॉगमागचे किस्से त्यांनी इथे शेअर केलेले पाहायला मिळाले. अशी ही बनवाबनवी चित्रपटाचे शूटिंग फिल्मसिटीत करण्यात आले होते. जे हवं ते तिथे मिळत असल्याने सोपं झालं होतं. या चित्रपटात डायबिटीज संबंधित असलेले डायलॉग हे लेखक वसंत सबनीस यांच्या स्वतःच्या अनुभवावरून घेतले होते. त्यावेळी त्यांनी इस्राईलवरून डायबिटीजची औषधं मागवली होती तेव्हा ७० रुपये खर्च आला होता. तोच अनुभव त्यांनी या चित्रपटासाठी घेतला होता.
चित्रपटात ३ डायलॉग ऐनवेळी सुचले होते ते म्हणजे ‘हा माझा बायको पार्वती’ जो अशोक सराफ यांना सुचला , ‘सारखं सारखं त्याच झाडावर काय?’ हा डायलॉग सचिन पिळगावकर यांना सुचला तर ‘जाऊ बाई, नका जाऊ ‘…हा डायलॉग लक्ष्मीकांत बेर्डे यांनी घेतला. दरम्यान सारखं सारखं त्याच झाडावर काय?…या डायलॉग मागची गंमत सांगताना सचिन पिळगावकर म्हणतात की, ” या सीनसाठी लक्षा साडी नेसून तयार झाला, विजू तयार होता, अशोक सायकल घेऊन तयार होता. अशोक रस्त्याने सायकल वरून जातोय हे मला एकाच फ्रेम मध्ये दिसायला हवं होतं. म्हणून त्या एका गार्डनच्या ठिकाणी शूट करायचं ठरलं. एका झाडावर अतिप्रसंग शूट झाला त्यानंतर मी लक्ष्याला दुसऱ्या झाडाकडे जायला सांगितलं. लक्ष्या त्या झाडाकडे गेला पण ते झाड वाकलं. मी त्याला दुसऱ्या झाडाकडे जायला सांगितलं पण तेही झाड वाकलं… असे जवळपास ७ झाडं वाकली.
तिथे ते एकमेव झाड मजबूत होतं. मी पुन्हा तो सीन त्याच झाडावर करायचं ठरवलं. माझा असिस्टंट डायरेक्टर जो माझा बालपणीचा मित्र होता अविनाश ठाकूर त्याला ते मुळीच आवडलं नाही. खूप ऑकवर्ड वाटतंय असं तो म्हणाला तेव्हा मी लक्ष्याला सांगितलं की, ” सारखं सारखं त्याच झाडावर काय?” असं म्हण. तेव्हा ते लक्ष्यालाही कळलं नव्हतं की हे नेमकं काय आहे. पण जेव्हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा या डायलॉगवर लोक अक्षरशः खाली कोसळले. ते एकमेव झाड नसतं तर हा डायलॉग आला नसता, आणि तो अजरामर झाला नसता”.