
नवऱ्याच्या आठवणीत अभिनेत्रीने स्वतःचं टक्कल करून त्यांचं ब्लेझर घालून फोटोशूट केलं आहे. या अभिनेत्रीचं हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही अभिनेत्री म्हणेजेच शांतिप्रिया होय. शांतिप्रिया हिने फुल और अंगार, सौंगंध , इक्के पे इक्का अशा अनेक हिंदी चित्रपटात काम केलं आहे. अक्षय कुमारची पहिली नायिका म्हणून तिची ओळख आहे. खरं तर दिवंगत मराठी अभिनेता सुशांत रे उर्फ सिद्धार्थ रे याची ती बायको आहे. अशी ही बनवाबनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, चाणी, वंश या चित्रपटात सुशांत झळकला आहे. तो व्ही शांताराम यांचा नातू देखील आहे. २००४ मध्ये सुशांतचे निधन झाले. त्याला आपल्यातून जाऊन जवळपास २१ वर्षे लोटली आहेत.

नवऱ्याच्या आठवणीत शांतिप्रिया हिने त्याचा ब्लेझर घालून एक फोटोशूट केलं आहे. यावेळी शांतिप्रिया हिने टक्कल करून घेतल्याने एक वेगळीच चर्चा पाहायला मिळत आहे. खरं तर तिचं हे टक्कल करण्यामागे एक खास कारण आहे. याबद्दल ती म्हणते की, “मी अलिकडेच टक्कल केले आणि याबद्दल माझा अनुभव खूपच चांगला आहे. एक महिला म्हणून आपण आयुष्यात अनेकदा मर्यादा घालतो, नियमांचे पालन करतो आणि स्वतःलाही बंदिस्त ठेवतो. या परिवर्तनासह मी स्वतःला मुक्त केले आहे, मर्यादांपासून स्वतःला मुक्त केले आहे आणि यामागे जगाने आपल्यावर लादलेल्या सौंदर्य परिभाषा तोडण्याचा माझा हेतू आहे आणि मी हे खूप धैर्याने आणि विश्वासाने करते आहे!”

शांतिप्रियाने टक्कल करून सौंदर्याची व्याख्याच बदलून टाकली आहे. पुढे ती म्हणते की, “आज मी माझ्या दिवंगत नवऱ्याच्या आठवणीत त्याचा ब्लेझर घातला आहे, ज्यामध्ये अजूनही मला त्याची उब जाणवते. ♥️” शांतिप्रिया हिने सावळ्या रंगावरून सुरुवातीच्या काळात लोकांकडून टोमणे खाल्ले होते. लोकांनी सुंदरतेची व्याख्या तयार केली आहे त्यांची ही मानसिकता बदलावी याहेतूने तिने हे फोटोशूट करून घेतलं आहे. त्यामुळे तिचं हे फोटोशूट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.