गेल्या एक दशकाहून अधिक काळापासून अपूर्वा नेमळेकर मराठी इंडस्ट्रीत काम करते आहे. या अभिनय कारकिर्दीच्या तिच्या प्रवासात अनेक चढउतार आले. पण या संकटांना खंबीरपणे तोंड देत स्वतःला सिद्ध करताना दिसत आहे. गेली ८ वर्षे अपूर्वा नेमळेकर स्वतःला सिंगल समजते. २०१७ हे वर्ष तिच्यासाठी खूप कठीण होतं कारण या वर्षात तिने तिच्या वडिलांना गमावलं होतं तर नवऱ्यापासूनही तिने घटस्फोट घेतला होता. त्यामुळे रात्रीस खेळ चाले २ मालिकेत काम करत असताना ती सेटवर कोणाशीच बोलत नसायची. तिच्या या कठीण काळाबद्दल नुकताच तिने उलगडा केला आहे.
आभास हा ही अपूर्वा नेमळेकरची अभिनित केलेली पहिली वहिली मालिका. याअगोदर ती परदेशात शिक्षणासाठी जाणार होती. पण मालिकेत संधी मिळाल्याने तिने अभिनय क्षेत्रातच काम करण्याचा निर्णय घेतला. २००४ साली अपूर्वाची रोहन देशपांडे सोबत ओळख झाली होती. या मैत्रीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. २०१४ मध्ये या दोघांनी प्रेमविवाह केला. पण अवघ्या काही वर्षातच दोघांचा घटस्फोट झाला. याबद्दल अपूर्वा म्हणते की, “आयुष्यात काही लोकांनी फसवणूक केली. जवळच्याच माणसांनी खरं माहीत असतानाही खोटी चित्र समोर उभी केली. फसवणूक काय असते ना याची चव दिली. ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं. १० वर्षे अफेअर होतं आमचं आणि त्यानंतर आम्ही लग्न केलं…छोटी गोष्ट नाहीये ती. त्यानंतर २०१७ मध्ये घटस्फोट झाला. आयुष्यात अशी काही माणसं आली ज्यांनी मला आयुष्यात सक्सेस होण्याची हिम्मत दिली. ही लोकं फार मोठी नाहीयेत पण आयुष्यभर मी त्यांना समोर ठेवूनच यशाचा टप्पा गाठत आले आहे.” असे अपूर्वा तिच्या घटस्फोटाबद्दल म्हणते.
दरम्यान अपूर्वाने रात्रीस खेळ चाले२ मालिकेत शेवंतांची भूमिका साकारली होती. पण अंतर्गत वादानंतर तिला ही मालिका सोडावी लागली. पण चॅनलने मला काम करण्यास नकार दिला असला तरी मी स्वतःच्या हिमतीवर इतर ठिकाणी काम मिळवत गेले. भविष्यात लग्न करण्याची इच्छाही तिने बोलून दाखवली. माझ्याकडे पैसा आहे, घर आहे सगळं आहे फक्त एक विश्वास ठेवणारा आणि विश्वास देणारा जोडीदार हवाय…असे ती म्हणते.