
अभिनेत्री जुई भागवत पाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीच्या मुलीची चित्रपट सृष्टीत दमदार एन्ट्री होत आहे. झापुक झुपुक या चित्रपटात जुई भागवत हिने मुख्य भूमिका साकारली आहे. जुई भागवत ही दीप्ती भागवतची मुलगी आहे तर १६ मे रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीच्या मुलीची चित्रपट सृष्टीत दमदार एन्ट्री होत आहे. साजिरी जोशी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. साजिरी जोशी बद्दल सांगायचं तर तिचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. ती लोकप्रिय अभिनेत्री ऋजुता देशमुख जोशी हिची लेक आहे. साजिरी आणि तिची आई ऋजुता या दोघींच्या दिसण्यात बरचसं साम्य तुम्हाला आढळेल.
साजिरीच्या दिसण्यातच तुम्हाला तिच्या आईची झलक पाहायला मिळाली नाही तरच नवल!. ऋजुता देशमुख आणि शिरीष जोशी हे दाम्पत्य गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. शिरीष जोशी हे दिग्दर्शक, गायक आहेत. गाण्याचे अनेक कार्यक्रम ते सादर करत असतात. तर ऋजुता देशमुख बालपणापासूनच अभिनय क्षेत्रात कासम करत आहेत. ज्येष्ठ अभिनेते अविनाश देशमुख आणि अभिनेत्री स्वाती देशमुख हे ऋजुताचे आईवडील आहेत. दोघांनीही रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातून एकत्र काम केले होते. इथे ओशाळला मृत्यु, राजा हा रयतेचा, प्रिय पप्पा या नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले तसेच या नाटकातून त्यांनी अभिनय देखील केला आहे. त्यामुळे साहजिकच ऋजुता देशमुख यांनाही लहानपणापासूनच अभिनयाची आवड निर्माण झाली. नाटक, मालिका, चित्रपट असा त्यांचा अभिनय क्षेत्रातला प्रवास अविरतपणे सुरु आहे.

आता रऋजुताची मुलगी साजिरी जोशी हिचेही मोठ्या पडद्यावर पदार्पण होत आहे. साजिरीला अभिनयाची आवड असून कथ्थक नृत्याचे तीने धडे गिरवले आहेत. कोलेजच्या नाटकात साजिरी सहभागी होत असे. यातूनच आता तिला ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटात ती ‘जाई’चे पात्र साकारत आहे. सुट्टीची धमाल मस्ती या चित्रपटात रेखाटण्यात आली असून साजिरीसोबत आर्यन मेघजी, मंथन काणेकर, श्रेयस थोरात, रविराज कांदे, सौमित्र पोटे, गौरी किरण, अक्षदा कांबळी, सई ब्रह्मे, स्मिता चव्हाण असे बरेचसे कलाकार झळकणार आहेत. या पहिल्या वहिल्या चित्रपटासाठी साजिरी जोशी हिचे मनःपूर्वक अभिनंदन!.