news

अनुराग कश्यपच्या त्या वक्तव्याने अमृता सुभाष होतेय ट्रोल… पण मैत्रिणीवर चिखलफेक होताच आला धावून

बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता अनुराग कश्यप ह्याने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने पडद्यामागचे अनेक धागे दोरे उलगडले आहेत. कलाकारांच्या अवास्तव मागण्या असो किंवा जास्त मानधन घेणारे कलाकार असो यांची पोलखोल त्याने या माध्यमातून केली आहे. माझ्या प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी अवास्तव मागण्या केल्या तर मी त्याला डच्चू देतो असे रोखठोक विधान तो करताना दिसत आहे. कलाकारांचा मेकअप करणारा आर्टिस्ट खरी मेहनत करणाऱ्या कलाकारांपेक्षाही जास्त पैसे घेतो. हे तो निर्माता म्हणून अनुभवलेल्या गोष्टी इथे सांगतो. अभिनेत्री अमृता सुभाष हिनेही अनुराग कश्यप सोबत तीन प्रोजेक्ट मध्ये काम केलेले आहे. रमण राघव, चोक्ड आणि सेक्रेड गेम्स मध्ये अमृता झळकली होती. पण या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी अमृताने अवास्तव मागण्या केल्या होत्या असे अनुराग कश्यप या मुलाखतीत सांगतो.

amruta subhash marathi actress
amruta subhash marathi actress

तिला सिंगल डोअर व्हॅनिटी व्हॅन हवी होती असे मला तिच्या मॅनेजरने सांगितले तेव्हा मी तिच्या मागण्या पाहून प्रोजेक्टमधून काढूनच टाकले. असे वक्तव्य अनुराग त्या मुलाखतीत करतो. त्याच्या या वक्तव्यावर आता अमृता सुभाषवर ट्रोलिंगचा वर्षाव होत आहे. पण अनुराग कश्यप याचे हे वक्तव्य पूर्ण न ऐकताच लोकं अमृताला ट्रोल करू लागली आहेत. अनुरागने पुढे असेही म्हटले होते की, तिला मी काढून टाकल्यानंतर तिनेच मला फोन करून काय झालं वगैरे विचारलं तेव्हा मी तिच्या मागण्यांची यादी समोर ठेवली. पण या मागण्यांबद्दल स्वतः अमृतालाच काही कल्पना नव्हती. तिने लगेचच तिच्या मॅनेजरला झापलं होतं असं अनुराग यावेळी सांगताना दिसतो. पण हे अर्धवट बोलणं ऐकून लोकं आपल्या मैत्रिणीवर चिखलफेक करतायेत हे पाहून अनुरागने स्वतःच या गोष्टीची दखल घेतली आहे.

anurag kashyap post
anurag kashyap post

अनुराग कश्यपने लोकांना शांत करत यावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, ” माझी मुलाखत पाहून खूप लोकं माझ्या जवळची मैत्रीण अमृता सुभाष हिच्यावर चिखलफेक करत आहेत. ही पोस्ट त्यांच्यासाठी आहे की मी ते फक्त एक उदाहरण म्हणून दिलं होतं. आमच्यामध्ये आजही एकमेकांबद्दल तेवढाच विश्वास आणि प्रेम आहे. चोक्ड या चित्रपटासंदर्भात ही गोष्ट झाली होती आणि तिने त्यात अप्रतिम काम केलं होतं. मॅनेजरकडून अवास्तव मागण्या होत असल्याचे पाहून मी तिला फोनवर बोललो होतो. पण तिला स्वतःलाच याबद्दल काही कल्पना नव्हती. तिने त्याबद्दल लगेचच गैरसमज दूर केला होता”. असे स्पष्टीकरण अनुराग कश्यप ट्रोलर्सना देत आहे. अनुराग कश्यप यांची ही पोस्ट अमृता सुभाषने सोशल मीडियावर शेअर करत त्याचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button