साईराज रातोरात स्टार झाला पण… पोटापाण्यासाठी वडापाव विकून गाणं लिहणाऱ्या आणि गाण्याचे बालगायक मात्र अंधारात
“आमच्या पप्पाने गंपती आणला” या एका गाण्याच्या रीलमुळे बीड जिल्ह्यातला साईराज केंद्रे हा चिमुरडा रातोरात स्टार झाला. साईराजच्या निरागस अभिनयाने नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतली. तिथेच या साईराजला आता चक्क गणपतीच्या गाण्यासाठीच कास्ट करण्यात आले. प्रवीण कोळी यांच्या ‘देवबाप्पा ‘ या नव्या गाण्यात साईराज झळकला आहे. सोशल मीडियावर एका रीलमुळे साईराजच्या अभिनयाची दखल घेण्यात आली मात्र या गाण्याचे जे मूळ गायक आहे त्यांना मात्र या प्रसिद्धीपासून बाजूला ठेवण्यात आले. हे गाणं गायलं होतं माऊली घोरपडे आणि शौर्या घोरपडे या बालगायकांनी. गेल्या वर्षीच या गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले होते. माऊली आणि शौर्याचे वडील मनोज घोरपडे आणि त्यांचे भाऊ मंगेश घोरपडे यांनी हे गाणं तयार केलं होतं.
मंगेश आणि मनोज घोरपडे यांनी हे गाणं दिग्दर्शित केलं असून आपल्याच मुलांना त्यांनी गाण्याची संधी दिली होती. मंगेश घोरपडे हे गेली अनेक वर्षे भिवंडीत वास्तव्यास आहेत. इथेच ते पोटापाण्यासाठी वडपावचा गाडा चालवतात. वडपावचा व्यवसाय त्यांच्या वाडीलांपासून होता. या व्यवसायात जम बसवत असताना त्यांनी गाणी लिहिण्याची आवड जोपासली. आमच्या पप्पानी गंपती आणला या गाण्याव्यतिरिक्त त्यांनी आणखी काही प्रेमागीतं यांच्या युट्युबवर शेअर केली आहेत. पण आमच्या पप्पाने या गाण्याची लोकप्रियता तर होतीच मात्र साईराजच्या रीलमुळे हे गाणं आणखीनच व्हायरल झालं. गाण्यामुळे साईराज रातोरात स्टार झाला पण या गाण्याचे बालगायक माऊली आणि शौर्याला देखील प्रसिद्धी मिळायला हवी असे आता प्रेक्षकांनी म्हटले आहे. माऊलीचे वडील मंगेश घोरपडे यांची याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी म्हटले आहे की, ‘साईराजमुळे आमच्या गाण्याला प्रसिद्धी मिळाली हे खूप चांगलं आहे.
लोकांना हे गाणं आवडलं यातच आमचं समाधान आहे. आम्हाला प्रसिद्धी मिळावी असा आमचा मुळीच उद्देश नाही उलट गाणं लोकप्रिय होतंय हे पाहून मला खूप छान वाटतंय.’ साईराज केंद्रे यांच्यामुळे मंगेश घोरपडे यांचं गाणं अजूनच हिट झालं आहे. या गाण्यावर अनेकजण आता रील बनवू लागले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात हे गाणं तुफान व्हायरल होणार यात शंका नाही. दरम्यान माऊली प्रोडक्शन्स प्रस्तुत आमच्या पप्पाने गंपती आणला या गाण्याला करोडोंचे व्ह्यूव्ह्ज मिळालेले आहेत. त्यामुळे अर्थातच माऊली आणि शौर्या देखील सोशल मीडियावर हिट होऊ लागले आहेत.