‘ती खूप भयंकर, बालीश आहे’ होणाऱ्या बायकोबद्दल ट्रोलिंग झालेलं पाहून अक्षय केळकरने दिलं मजेशीर उत्तर

सोशल मीडियावर ट्रोल होणं ही गोष्ट काही आता गौण राहिलेली नाही. कारण तुम्ही कितीही चांगली गोष्ट केली किंवा वाईटही काही केलं तरी तुम्ही कोणाकडून तरी ट्रोल होणार हे ठरलेलं गणित आहे. कलाकार म्हटलं की हे होणारच हे कलाकारांना देखील ठाऊक असतं त्यामुळे आता बहुतेक कलाकार अशा ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करताना दिसतात. पण आता लवकरच अभिनेता अक्षय केळकर लग्नबंधनात अडकणार आहे. गायिका साधना काकतकर ही अक्षयची रमा आहे . गेल्या १० वर्षांपासून ते एकमेकांना चांगले ओळखतात.
युट्युबवर हे दोघेही त्यांच्या लग्नाची अपडेट देत असतात. पण अशाच एका व्हिडिओवर अक्षयला एका महिला नेटकऱ्याने धोक्याचा इशारा दिला आहे. व्हिडिओवर एक कमेंट करताना त्या महिलेने अक्षयला सांगितले की, “भयंकर आहे ही, स्वतःला उगाच शहाणी, अति समजते, कशात काय आणि फाटक्यात पाय, बालीश आहे.” ती असं या ट्रोलरने साधना बद्दल अक्षयला सांगितलं आहे. पण जो साधनाला गेल्या १० वर्षांपासून ओळखतो तो अक्षय या ट्रोलर्सला मजेशीर उत्तर देताना म्हणतो की, ….”तुमचा अनुभव नक्की असेलच चांगला, तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आल्याशिवाय तुम्हाला तसं दिसणार नाही याची मला खात्री आहे.

पण म्हटलं आयुष्याची वाट सोपी न निवडता खडतर वाटेने जाऊया म्हणून बालीश, भयंकर आणि अतिशहाणी निवडलेली आहे. लग्न ठरलंय हो! सोशली सांगितलंय पण ओ!…त्यामुळे काही होऊ शकत नाही आता…एखाद्याने विहिरीत उडी मारायची ठरवली असेल तर तुम्ही कोण ते अडवणारे…आता बिग बॉसनंतर तर मी कुठेही राहून जगू शकतो…”असे अक्षयने या ट्रोलर्सला उत्तर दिले आहे. दरम्यान साधनाने स्वतः ही कमेंट वाचली तेव्हा तिने स्वतःहून ही कमेंट अक्षयला दाखवली. मी खरंच बालीश आहे का किंवा भयंकर आहे का? असे तिने अक्षयला विचारले आहे. त्यावर अक्षयने ही मजेशीर प्रतिक्रिया दिलेली आहे.