महाराष्ट्र सरकारने जुलै महिन्यात ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील दोन कोटींहून अधिक मुली आणि महिलांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत या लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये महिना याप्रमाणे ५ महिन्यांचे एकूण ७५०० रुपये जमा झाले. तर काही बहिणींना अजूनही खात्यात पैसे मिळाले नसल्याचे समोर आले आहे. पण बँकेच्या खात्याला आधार लिंक केल्यानंतर हे पैसेही त्यांना देण्यात येतील असे वारंवार शासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान आता गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस देणार असल्याच्या बातम्या पसरू लागल्या आहेत.
शासनाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही महिन्यांचे हप्ते ऑक्टोबर महिन्यातच दिले होते. पण या मासिक हप्त्या व्यतिरिक्त दिवाळी बोनसही दिला जाणार अशी बातमी व्हायरल झाली. आतापर्यंत तीन हप्ते मिळालेल्या लाडक्या बहिणींना ३००० रुपये अधिकचा बोनस दिला जाईल तर काही निवडक मुली महिलांना आणखी २५०० रुपये दिले जातील असे या बातमीत सांगण्यात आले होते. म्हणजेच काही बहिणींना ३००० तर काहींना ५५०० रुपये मिळणार असे त्यात म्हटले गेले. पण याबद्दल शासनाकडून कुठलीही अधिकृत माहिती दिली नसल्याने अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तेव्हा या बातमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीच एक मोठा खुलासा केलेला पाहायला मिळतो आहे.
लाडक्या बहिणींना दिवाळीत दिल्या जात असलेल्या बोनसबाबतचं वृत्त खोटं आहे, शासनाकडून आहि कुठलीही घोषणा केली गेली नसल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. याबद्दल शासनाने कुठलाही निर्णय दिलेला नाही, असे स्पष्टीकरणच आदीती तटकरे यांनी दिलं आहे. काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेल्या बहिणींना मोबाईल गिफ्ट देणार असल्याची बातमी पसरली होती. आदिती तटकरे यांच्या खुलास्यानंतर आता या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट होत आहे.