प्रत्येक स्त्रीसाठी आईपण हे एक सोनेरी स्वप्न असतं. कित्येकांच्या आयुष्यातील हे स्वप्न सत्यात उतरलेलं पाहायला मिळतं. पण हा आईपणाचा अनुभव घेत असताना त्या स्त्रीला सुरुवातीला अनेक यातना सहन कराव्या लागतात. एवढंच नाही तर रात्र रात्र जागून त्या टप्प्यातून तिला त्या प्रवासातून जावं लागतं. अर्थात हा प्रवास त्या आईसाठी नक्कीच सोपा नसतो. त्याचमुळे कधीकधी तुम्ही डिप्रेशन मध्येही जाऊ शकता, नेमका हाच अनुभव अभिनेत्री आदिती सारंगधर हिने घेतलेला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीतून आदिती सारंगधर हिने त्या कठीण काळातल्या आठवणींना उजाळा दिला आहे. या प्रवासात तिला खूप डिप्रेशनचा सामना करावा लागला होता असे ती म्हणते.
वादळवाट, लक्ष्य, नवे लक्ष्य , येऊ कशी तशी मी नांदायला अशा कित्येक मालिका तसेच चित्रपटातून आदिती सारंगधर हिने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे . २०१३ साली सुहास रेवंडेकर ह्याच्याशी तिने लग्नगाठ बांधली. मुलगा अरीनच्या जन्मानंतर आदिती पुन्हा अभिनय क्षेत्रात दाखल झाली. अर्थात लक्ष या मालिकेच्या सेटवर ती तिच्या मुलालाही घेऊन यायची त्यामुळे मुलाची काळजी मिटायची. पण जेव्हा अरीनचा जन्म झाला तेव्हा मात्र कोणीच मदतीला नसल्याने आदिती खूपच त्रस्त झाली होती. याचदरम्यान आदिती कधी कधी अचानक रडायला लागायची. याबद्दल ती म्हणते की, “तेव्हा ती डिप्रेशनमधून जात असते, ती कधीही रडते पण लोकांना वाटतं की हे नॉर्मल आहे, मुलाची काळजी घे असं ते सांगतात. पण नाही मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की बाळंतीण झालेल्या बाईची काळजी घ्या , ती जर आनंदी राहिली तर मुलाची काळजी कोणीही घेऊ शकेल.ती तिच्या मुलाची काळजी घेणारच ना ती काय तिच्या मुलाला थोडीच वाऱ्यावर सोडून देणार. त्याकाळात मला भेटायला येणारी माणसं ही बाळाला बघायला यायची. पण मला असं म्हणायचंय तुम्ही त्या आईला बघायला या ना. तिने पण तेवढंच सोडलंय, कदाचित जास्त.
पण लोकांना ह्याबद्दल काहीच वाटत नाही. ते फक्त विचारतात बघू गं बाळ कसं आहे.पण तेव्हा मी माझं बाळ कोणाच्याच हातात देत नव्हते. मी सरळ सांगायचे की, माझ्या बाळाशी लांबून बोलायचं. त्याला काही इन्फेक्शन झालं तर तुम्ही रात्रीचं नाही येणार जागायला किंवा औषध पाजायला. माझ्या मदतीला त्यावेळी कोणीच नसायचं. आई नाही, सासू नाही, वडील होते पण ते कल्याणला होते. ते डॉक्टर असले तरी आज्जीला सोडून येऊ शकत नव्हते. माझ्या नवऱ्याला पण वडील नाहीत त्यामुळे जवळ कुटुंब म्हणावं असं कोणीच नव्हतं . दुर्दैवाने मेड ,ज्याला उत्तम अनुभव आणि ज्ञान असावं असं आजूबाजूला कोणीच नव्हतं. त्यामुळे अशी परिस्थिती आली होती की बाळाला आता टाकणार आणि मी पण उडी मारणार.मी खिडकी लाऊन घेतली आणि आजपासून खिडकीच्या बाहेर जायचं नाही. तेव्हा मी कौंसलरकडे गेले आणि माझी परिस्थिती त्यांना सांगितली.”