त्या दिवशी मुलीला घरी ठेऊन आम्ही दोघे ताज हॉटेलमध्येच होतो त्यावेळी ….सोनालीने सांगितला २६/११ चा तो प्रसंग
सोनाली खरे अभिनित आणि निर्मित ‘माय लेक ‘ हा चित्रपट येत्या १९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. या चित्रपटातून सोनाली खरे हिची लेक म्हणजेच सनाया आनंद ही अभिनय क्षेत्रात एन्ट्री करत आहे. त्यामुळे सोनाली साठी हा चित्रपट तेवढाच महत्वाचा ठरणार आहे. दरम्यान सोनाली खरे या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रातही उतरत आहे. अभिनेता बीजय आनंद सोबत सोनालीने लग्न केले आहे. माय लेक या चित्रपटाचाही तो एक भाग असणार आहे. उमेश कामत, शुभांगी लाटकर, संजय मोने असे कलाकार चित्रपटाला साथ देत आहेत. चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली खरे हिने प्लॅनेट मराठीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने २६/११ च्या घटनेचा तो थरार अनुभव शेअर केला आहे. या घटनेला आता बरीच वर्षे झाली आहेत त्यावेळी सोनाली खरे हिची मुलगी सनाया अवघ्या ४ महिन्यांची होती.देवाच्या कृपेने हा माझा दुसरा जन्म आहे असे ती या मुलाखतीत सांगते.
सनायाचा जन्म झाल्यानंतर चार महीन्यांनी बीजय आनंद याने सोनालीला ताज हॉटेलवर डेटवर न्यायचे ठरवले. घर जवळच असल्याने सनायाला त्यांनी घरीच ठेवले होते. ” हा माझा दुसरा जन्म आहे कारण त्या दिवशी, त्या रात्री आम्हाला अजिबात अशी कल्पना नव्हती की आम्ही तिथून बाहेर पडू. पण देवाच्या कृपेने आणि सगळ्या जणांच्या आशीर्वादामुळे पोलीस फोर्स आणि आर्मीच्या मदतीने आम्ही ताज हॉटेलमधून सुखरूप बाहेर पडलो. तो अनुभव आम्ही आयुष्यभर विसरणार नाही.सनायाचा जन्म झाला होता तेव्हा फारसं बाहेर जायला जमत नव्हतं पण जेव्हा बीजयने डेटवर न्यायचे ठरवले म्हणून मग आम्ही तिथे गेलो होतो . एक तासात परत येऊ या विचाराने आम्ही तिला घरीच ठेवून गेलो होतो.आम्ही तिथे आत शिरलो आणि सगळी सुरुवात झाली. सकाळ झाली तरी आम्ही तिथेच अडकून होतो. कोण मदतीला येतंय काय याचे आम्हाला अंदाज मिळत होते पण तिथून आमची सुटका होईल याबद्दल आम्हाला शंका होती.
त्यामुळे लेकीच्या काळजीत आम्ही पुढच्या प्लॅनसाठी नातेवाईकांना फोन करण्यास सुरुवात केली. माझ्या आईला, सासूला, मित्र मैत्रिणींना आम्ही सगळ्यांना फोन लावले होते. पण लकिली आमची त्यातून सुटका झाली आणि आम्ही घरी पोहोचलो. महत्वाचं म्हणजे माझी ४ महिन्यांची लेक त्यादिवशी अजिबात उठली नाही ती पहाटे पर्यंत झोपून राहिली होती. तिच्याजवळ कोणीच नव्हतं म्हणून मग शेजाऱ्यांना आम्ही तशी कल्पना देऊन ठेवली होती. फक्त बेल वाजवू नका नाहीतर ती उठेल असे त्यांना सांगून ठेवले होते. कारण लहान मुलं दर दोन तासाला उठतात पण ती त्या रात्री झोपून राहिली. हा माझा दुसरा जन्म आहे असे मी म्हणते त्यामुळे हे दुसरं आयुष्य मी मनसोक्त जगावं अशी माझी ईच्छा आहे.”