वर्ष संपतंय तसं अनेक मराठी कलाकार विवाहबंधनात अडकताना दिसले होते. त्यात स्टार प्रवाहवरील नवे लक्ष मालिका अभिनेत्री ऋतुजा लिमये हिनेही लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळाली. एक नवीन प्रवास म्हणत ऋतुजा लिमये हिने तिच्या लग्नाचे काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ऋतुजा लिमये हिने काही दिवसांपूर्वीच अभिनेता, निर्माता हृषीकेश पाटील सोबत लग्न केले. हे लग्न पुण्यात पार पडले होते.
रात्रीचा पाऊस, चंद्रमुखी अशा चित्रपटासाठी त्याने निर्माता म्हणून काम केलं आहे. तर अभिनेता म्हणून रात्रीचा पाऊस हा त्याचा पहिला चित्रपट ठरला. ऋतुजा लिमये ही गेले अनेक वर्षे मॉडेलिंग तसेच अभिनेत्री म्हणून काम करत आहे. भरत जाधव यांच्या पुन्हा सही रे सही या नाटकात ती एका महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती.
नवे लक्ष या मालिकेनंतर तिने अनेक जाहिरातींसाठी मॉडेल म्हणून काम केले. ऋतुजा आणि हृषीकेश दोघेही गेले काही वर्षे एकमेकांना ओळखत होते. रात्रीचा पाऊस या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. तेव्हापासून त्यांच्यात प्रेमाचे सूर जुळून आले. दरम्यान ४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता हे दोघे लग्नबांधनात अडकलेले पाहायला मिळत आहेत. मराठी सेलिब्रिटींनीही त्यांच्या लग्नाच्या बातमीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.