
मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर हिने नुकत्याच एका बाळाला जन्म दिला आहे. सई लोकूरला आज कन्यारत्न प्राप्ती झाली असल्याने तिच्या चाहत्यानी अभिनंदनाचा वर्षाव करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत . मराठी सेलिब्रिटींनी देखील सई लोकूरचे कन्यारत्न प्राप्ती निमित्त अभिनंदन केले आहे. मराठी बिग बॉसच्या पहिल्या सिजनमध्ये सई लोकूर हिने पार्टीसिपेट केले होते. या सिजनमध्ये ती थर्ड रनरअप ठरली होती. या शोमध्ये तिची शर्मिष्ठा राऊत आणि मेघा धाडे यांच्यासोबत छान मैत्री जुळली होती ही मैत्री त्यांनी आजही टिकवून ठेवलेली पाहायला मिळते आहे. कारण कालच सईने तिच्या होणाऱ्या बाळासाठी मुलगा की मुलगी? असे वोटिंग करणारे एक रील बनवले होते. तिच्या जवळच्या मित्र मैत्रिणी तसेच नातेवाईकांनी सईला मुलगा होणार की मुलगी हे सांगितले होते.

तेव्हा सईला मुलगीच होणार असे मत अनेकांनी व्यक्त केले होते. सईच्या या जवळच्या लोकांनीच वर्तवलेले हे भाकीत आज खरे ठरलेले पाहायला मिळाले. सईला देखील मुलगीच हवी होती असे तिने या व्हिडिओत म्हटले होते त्यामुळे मुलीच्या आगमनाने सई खूपच खुश झाली आहे. ३० नोव्हेंबर २०२० मध्ये सईने तिर्थदीप रॉय सोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर ती इंडस्ट्रीतून मात्र बाजूला झालेली पाहायला मिळाली. दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून सई तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत होती. याचदरम्यान वजन वाढल्यामुळे तिला ट्रोलही करण्यात आले होते. पण त्यावेळी सई प्रेग्नंट असल्याचे समजले तेव्हा हे ट्रोलिंग कुठेतरी थांबलेले दिसले. काही दिवसांपूर्वीच सईचे डोहाळजेवण पार पडले त्यावेळी मेघा धाडेला तिने खूप मिस केले पण त्यानंतर मेघा आणि शर्मिष्ठा यांनी तिची आवर्जून भेट घेतली.

सई लोकूर बद्दल सांगायचं तर ती मराठी चित्रपट तसेच हिंदी मालिका अभिनेत्री आहे. लहान असतानाच सईने कुछ तुम कहो कुछ हम कहें, पकडा गया या हिंदी चित्रपटातून बालकलाकार म्हणून काम केले होते. पारंबी, आम्ही तुमचे बाजीराव, नो एन्ट्री पुढे धोका आहे, जरब, किस किसको प्यार करूं हे तिने प्रमुख अभिनेत्री तसेच सहाय्यक अभिनेत्री म्हणून चित्रपट केले. मराठी बिग बॉसच्या पहिल्या सिजनमध्ये सईला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर ती अस्सल पाहुणे इरसाल नमुने, एकदम कडक अशा रिऍलिटी शो मध्ये झळकली होती. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तिर्थदीप सोबत सईचे लग्न जुळले आणि त्याबरोबरच तिने या इंडस्ट्रीतून काढता पाय घेतला. अर्थात आता घरसंसारत रमलेली सई लोकूर लेकीच्या आगमनाने खूपच खुश झाली आहे. तिच्या या आनंदावर मराठी सेलिब्रिटींनी देखील अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो. कन्यारत्न प्राप्तीसाठी आणि आईपणाच्या या नवीन जबाबदारीसाठी सई लोकूर हिचे अभिनंदन.