मी २३ वर्षाची होते तेव्हा एका मोठ्या स्टारने मला एकटी ये आणि ….कास्टिंग काऊच आणि घटस्फोटाबद्दल अभिनेत्रीनं सोडलं मौन
बॉलिवूड चित्रपटात अनेक मराठमोळ्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. या संधीचं त्यांनी सोनं केलेलं पाहायला मिळालं. अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिनेही या इंडस्ट्रीत स्वतःची ओळख बनवली. मोठमोठ्या स्टार्ससोबत तिला काम करण्याची संधी मिळाली. पण हे काम करत असताना तिने अनेकदा कास्टिंग काऊचचा अनुभव घेतला आहे. मी या सगळ्या गोष्टी आईवडिलांसोबत शेअर केल्या आहेत, कर नाही तर डर कशाला या मताची ती आहे त्यामुळे कदाचित ती या इंडस्ट्रीत टिकली नाही. जे चुकीचं होतंय त्याला विरोध करायला हवा या मताची ती असल्याने ईशाला डावलण्यात आलं असे ती सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सांगते. मध्यंतरी तनुश्री दत्तामुळे मी टू प्रकरण खूपच गाजलं होतं. यावर आता ईशा कोप्पीकरनेही मौन सोडलेलं पाहायला मिळालं.
वयाच्या १६ व्या वर्षी ईशा कोप्पीकर हिने मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल टाकले होते. यातूनच तिला साऊथ चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली होती. पण हिंदीत काम करत असताना तिच्या वाट्याला आयटम सॉंग आले त्यामुळे तिची एक वेगळी इमेज तयार झाली. इथे काम करताना अनेक जणांकडून तिला वाईट अनुभव मिळाले. सेटवर तर अनेकदा अंगाला हात लावले जातात होते. त्यांचा तो स्पर्श खूप काही सांगून जायचा असे ती म्हणते. एका अनुभवाबद्दल ती म्हणते की, वयाच्या १८ व्या वर्षी मला एका सेक्रेटरीकडून कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. मी २३ वर्षाची होते तेव्हा हिंदी इंडस्ट्रीतील एका मोठ्या स्टारने मला फोन केला आणि एकटी ये ड्रायव्हरला सोबत आणू नको असे सांगितले. त्याला भीती होती की याबद्दल लोकं काही बोलू लागतील. कारण याअगोदर त्याच्याबद्दल चर्चा चालू होत्या. सोबत येणाऱ्या स्टाफमुळे अनेकदा तो अडचणीत सापडला होता. आज या इंडस्ट्रीत त्याचं मोठं नाव आहे.
या मुलाखतीत सिध्दार्थने ईशाला तिच्या घटस्फोटाबद्दल बोलतं केलं. काही दिवसांपूर्वी टीमी नारंग सोबत ईशाने घटस्फोट घेतला होता. १४ वर्षांचा त्यांचा संसार मोडीत निघाल्याने हा विषय निघताच ईशाला अश्रू अनावर झाले. “नातं टिकवून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. जेव्हा तुम्हाला जाणीव होते की त्याला तुमची गरज नाही तेव्हा एकमेकांत अडकून राहण्यापेक्षा त्या नात्याला मोकळं केलेलं बरं. त्याला जर हे नातं टिकवायचं नसेल किंवा मला ते नातं टिकवायचं नसेल तेव्हा ते नातं तिथंच संपवावं” असं ईशा तिच्या घटस्फोटाबद्दल म्हणते.