शूटिंग दरम्यान घडलेल्या त्या प्रसंगातून कसाबसा जीव वाचला अभिनयाला रामराम ठोकला पुढे भारताबाहेर अमेरिकेत राहून
चंदेरी दुनियेत असे अनेक कलाकार आले जे एकेकाळी खूप लोकप्रिय झाले होते. ९० च्या दशकात अशाच एका नायिकेने आपल्या निस्सीम सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. पण आता अभिनय क्षेत्रापासून दूर जाऊन ही अभिनेत्री स्वतःची एक वेगळी ओळख जपताना दिसत आहे. ही अभिनेत्री आहे अर्चना जोगळेकर. एकेकाळी मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत अर्चना जोगळेकर यांनी मोठे नाव कमावले होते. अर्चना जोगळेकर यांना बालपणापासूनच संगीत, नृत्याचा वारसा मिळाला. आई आशा जोगळेकर यांच्या आई सुरेखा जोशी या शास्त्रीय गायिका. बालगंधर्व यांच्यासोबत त्यांनी संगीत नाटकातून काम केले होते. वयाच्या सहाव्या वर्षी अर्चना जोगळेकर त्यांच्या आईकडे नृत्याचे धडे गिरवू लागल्या. ‘उघडले स्वर्गाचे दार’ या नाटकामुळे अर्चना जोगळेकर यांचं नाव खूप गाजलं. यातूनच त्यांनी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले.
अर्धांगी, खिचडी, मर्दनागी, बिल्लू बादशाह, संसार, बात है प्यार की, निवडुंग अशा चित्रपटातून काम केले. १९९७ मध्ये अर्चना जोगळेकर ओडिसामध्ये एका ओडिया चित्रपटासाठी गेल्या होत्या. तिथे एका व्यक्तीने त्यांच्यावर बलात्कार तसेच प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण त्या व्यक्तीच्या तावडीतून त्यांनी कसातरी स्वतःचा जीव वाचवून तिथून पळ काढला. यानंतर अर्चना यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली होती आणि २०१० मध्ये त्या व्यक्तीला १८ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती अशी एक बातमी वृत्तपत्रातून छापून आली होती. पण या घटनेने अर्चना यांचे आयुष्य कायमचे बदलून गेले. बरेच वर्ष अर्चना जोगळेकर कोणत्याही चित्रपटात तसेच गाण्यात पाहायला मिळाली नाही. ९० च्या दशकात मराठी चित्रपट जोर धरताना पाहायला मिळाले अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा तो सुवर्णकाळ होता काही चित्रपटांत तिने ह्या अभिनेत्यांसोबत उत्तम काम देखील केलेले होते. अनेक मराठी चित्रपटात अर्चना जोगळेकर पाहायला मिळाली ती अचानक चित्रपट सृष्टीतून दिसेनाशी झाली. अर्चना जोगळेकर कुठे गेली? ती काय करते ? असा प्रश देखील चाहत्यांना पडू लागला.
पुढे सायंटिस्ट आलेल्या डॉ निर्मल मुळ्ये यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर त्या अमेरिकेत राहू लागल्या. १९९९ मध्ये न्यू जर्सी येथे त्यांनी स्वतःची एक नृत्य शाळा देखील उघडली. आजही भारतात येऊन त्या वेगवेगळ्या मंचावर आपल्या नृत्याची कला सादर करताना दिसतात. “अर्चना आर्ट्स” ही अतिशय उच्च शास्त्रीय नृत्य प्रणाली आहे जी यूएसए मध्ये सर्वांसाठी उपलब्ध आहे. तिच्या पूज्य आई आशाजींनी सुरू केलेली आणि अर्चना जींनी फुलवलेली, अर्चना आर्ट्स ही एक अद्भुत नृत्य संस्था आहे जिथे विद्यार्थी भारतीय वंशाच्या नृत्याची पद्धतशीरपणे सुंदर कला शिकतात. अर्चना चंदेरी दुनियेपासून त्या खूप दूर असल्या तरी आजही त्या अभिनय क्षेत्राला मिस करताना दिसतात. ध्रुव मुळ्ये हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. ध्रुवला संगीताची आवड असून तो तबला वादन देखील करतो.