बऱ्याचशा कलाकारांना अभिनय क्षेत्रात यश मिळेलच की नाही याची शाश्वती देता येत नाही. अर्थात तुम्ही जर दिसायला उत्तम असाल आणि तुमचा फॅनफॉलोअर्स चांगला असेल तर लगेच तुम्हाला कास्ट केलं जातं. पण आपण दिसायला चांगले नाहीत आणि म्हणावे तसे काम मिळत नाही म्हणून मग व्यवसायाकडे वळलेले मोजके कलाकार तुम्हाला माहीत असतील. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे आरती वाडगबाळकर. आरती वाडगबाळकर हि सध्या आपली सोशल वाहिनी साठी सूत्रसंचालका म्हणून काम करत आहे. पण कधीकाळी तिने तिच्या दिसण्यावरून अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतलेला पाहायला मिळाला. आरती वाडगबाळकर हिचे आई वडील दोघेही संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्या मुलीनेही याच क्षेत्रात करिअर घडवावे अशी त्यांची इच्छा होती. पण कॉलेजमध्ये असल्यापासूनच आरतीला अभिनय क्षेत्राची ओढ लागली.
आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धा, एकांकिका यामधून ती सहभाग घेऊ लागली होती. पुढे तिला व्यवसायिक नाटकात येण्याची संधी मिळाली. यातूनच शुभंकरोती मलिकेसाठी तिची निवड करण्यात आली. कशाला उद्याची बात, शुभंकरोती अशा एकाचवेळी ती दोन मालिकेत काम करू लागली. पण आपण दिसायला चांगले नाही आहोत आणि तुम्हाला जर मैत्रीण म्हणून, शेजारीण किंवा कुठली सहाय्यक भूमिका देणार असतील तर इथे थांबलेलं बरं या विचाराने तिने अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला. त्यानंतर तिने ‘कलरछाप’ या नावाने कपड्यांचा ब्रँड सुरू केला. त्यात तिला तिच्या नवऱ्याची देखील मोठी साथ मिळाली. व्यवसाय करायचा पण त्याचं कुठंतरी नाव व्हावं अशी तिची इच्छा होती त्याचमुळे संपूर्ण वेळ तिने या व्यवसायात स्वतःला झोकून दिले.
मधला कोरोनाचा काळ तिच्यासाठी थोडा कठीण गेला. कारण नवरा अशुतोष परांडकर हा देखील लेखक म्हणून याच क्षेत्रावर अवलंबून होता. पण कालांतराने तिचा हा ब्रँड नावारूपाला आला. आरती वाडगबाळकर हिने अशुतोषसोबत प्रेमविवाह केला. त्याच्यासोबत लग्न व्हावं म्हणून ती त्याच्याच कॉलेजमध्ये शिकायला गेली होती. कॉलेजमध्ये असतानाच आरतीला अशुतोष आवडू लागला. तो पुण्याला शिकायला होता म्हणून मग आरतीने तिचे शिक्षण घेण्यासाठी त्याच्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. एक वर्षात तिने त्याला लग्नासाठी पटवले. याचदरम्यान आरतीला नाटकांसाठी विचारणा होऊ लागली तेव्हा अशुतोषची संमती घेऊन ती पुन्हा मुंबईत आली.