आज १० वर्षे झाली मी रात्री जेवत नाही.. केवळ ५ महिन्यांत २४ किलो वजन कमी केलं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज्यांची भूमिका
शरीर रचनेवर कलाकारांचे काम , त्यांची भूमिका अवलंबून असते. कुठल्याही पात्राला तो चेहरा, तो व्यक्ती योग्य आहे की नाही याची निवड त्या ऑडिशनमधूनच करण्यात येत असते. त्यामुळे तुम्ही दिसायला हँडसम किंवा सुंदर असाल तरच प्रमुख भूमिकेसाठी तुमची निवड केली जाते. तर बेढब शरीर रचना असलेल्या कलाकारांना विनोदी भूमिका किंवा एखादे सहाय्यक पात्र दिले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळावी त्यासाठी अनेक कलाकार खस्ता खात असतात. पण ते भाग्य सगळ्यांच्याच नशिबात असते असे मुळीच नाही. तुम्हाला चूक भूल द्यावी घ्यावी मधला बालपणीचा टेण्या भाऊजी आठवतो? किंवा जय भवानी जय शिवाजी मालिकेतील किशोरवयीन छत्रपती शिवाजी महाराज आठवतो? ह्या भूमिका साकारण्यासाठी अभिनेता विहंग भणगे याने रात्रीचे जेवण वर्ज्य केले आहे. आज या गोष्टीला जवळपास १० वर्षे पूर्ण होत असल्याची त्याने एक आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
विहंग भणगे हा एक बालकलाकार म्हणून नावारुपाला आलेला कलाकार आहे. विहंगने देवकी या मराठी चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. पुढे एका कार्यक्रमात त्याला मराठी सृष्टीतील अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेण्याची संधी मिळाली होती. मोठ्यांचे बालपण कसे होते हे त्याला या मुलाखतीत अनुभवता आले होते. विहंग लहान असल्यापासूनच खूपच हेल्दी मुलगा होता. त्यामुळे मोठेपणीही त्याचे शरीर वाढतच जात होते. पण आपल्याला जर कलाकार म्हणून या सृष्टीत ओळख बनवायची असेल तर आपल्या खण्यापिण्यावर आपलं नियंत्रण हवं या विचाराने तो पेटून उठला. वाढलेल्या शरीरावर नियंत्रण मिळवायचं असेल तर रात्रीचं जेवण करायचं नाही असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. बघता बघता त्याला या गोष्टीचा चांगला परिणाम जाणवू लागला. ही आठवण सांगताना विहंगने त्याचे पूर्वीचे काही फोटो आणि आताचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
याबद्दल सविस्तर लिहिताना तो म्हणतो की, “आज १० वर्षे झाली मी रात्री जेवत नाही. तसा त्रास काहीच होत नव्हता, पण बारीक होण्याची नितांत गरज होती. मग ठरवलं आजपासून खाण्यावर संयम ठेवूया. डाएट करूया. संतुलित आणि मर्यादित आहार घेऊया. तेव्हापासून अनेक आवडीच्या पदार्थांना राम राम ठोकला तो आजतागायत. केवळ ५ महिन्यांत २४ केलो वजन तज्ञांच्या सल्ल्याने कमी केलं. बारीक झालो नसतो तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळाली नसती. ना टेण्या भाऊजी मिळाले असते, ना बॉईज मधल्या १० वी तल्या मुलाची भूमिका ,ना इतर कोणती पात्र.” असे म्हणत विहंगने त्याच्या घेरलेल्या मेहनतीचे चीज झाले असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी बेढब शरीरावरुन तुम्हाला हिनवले जाते असे आरती सोळंकीने निदर्शनास आणून दिले होते. पण तिनेही यावर खूप मेहनत घेऊन स्वतःमध्ये कमालीचा बदल घडवून आणला आहे.