माझ्याबद्दल इतक्या अफवा पसरवल्या कि मला काम मिळेनासं झालं… जेष्ठ अभिनेते सतीश पुळेकर यांनी व्यक्त केली खंत
आज ४ नोव्हेंबर दिग्दर्शक, अभिनेते सतीश पुळेकर यांचा जन्मदिवस. सतीश पुळेकर यांनी नाटकपासून त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. हळद रुसली कुंकू हसलं, समायरा, पोलीस लाईन, फक्त लढ म्हणा, बे दुणे साडेचार, उरी द सर्जिकल स्ट्राईक, तुमची मुलगी काय करते अशा अनेक नाटक, चित्रपट, मालिकांमधून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. पण सतीश पुळेकर यांना अनेक चांगल्या भूमिकांपासून वंचित राहावे लागले होते अशी एक खंत त्यांनी विक्रम गोखले यांना दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली होती.
या इंडस्ट्रीने आपल्याला अलगद बाजूला कसे केले याबद्दल ते सांगतात, ” घरची परिस्थिती बेताची त्यामुळे शाळेत असताना एका मित्राने मला लंगडी आणि खोखो खेळण्यासाठी विजय क्लबमध्ये नेले. इथे मी १४ वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर खोखो खेळलो त्यामुळे वेळ पाळणे आणि शिस्तबद्ध काम करणे माझ्या अंगवळणी पडलं होतं. त्यामुळे पुढे नाटकांचे दिग्दर्शन करत असताना मी खूप कडक शिस्तीचा आहे असा गैरसमज सर्वदूर पसरू लागला. बहुतेकदा चांगल्या भूमिकेपासून, चांगल्या कामापासून मला वंचित राहावे लागले. आई थोर तुझे उपकारच्या वेळी मी दिग्दर्शकाच्या कानाखाली वाजवली अशी अफवा पसरवली गेली होती. त्यामुळे माझी या इंडस्ट्रीत एक वेगळी इमेज तयार झाली होती.
मी गॉसिप जास्त करत नाही आणि कुठल्या ग्रुपशीही मी जास्त जोडलेला नाही. त्यामुळेही कदाचित माझं नाव सुचवण्यात येत नसे. माझे कुठल्या प्रोजेक्टसाठी नाव सुचवले तर ‘तो अर्ध्यातून काम सोडेल, त्याला भयंकर राग येतो’… अशा अफवा पसरवल्या जाऊ लागल्या. मग कित्येक दिवस नव्हे तर महिनो न महिने माझ्याकडे कुठलेच काम नसायचे. अगदी उत्कृष्ट दिग्दर्शन आणि अभिनयाची पारितोषिकं मिळवूनही माझ्याकडे पुढे काहीच काम नसायचे.”