ज्येष्ठ अभिनेते राजू पटवर्धन यांचे दुःखद निधन… अर्धांगवायू , विकलांग अवस्थेमुळे अखेरच्या दिवसांत आर्थिक संकटांना
ज्येष्ठ अभिनेते राजू उर्फ राजेंद्र पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ७० व्या वर्षी ररूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आमची बटाटाची चाळ ,एकच प्याला, सौजन्याची ऐशी तैशी अशा अनेक नाटकातून राजू पटवर्धन यांनी त्यांच्या अभिनयाने रंगभूम गाजवली होती. अनेक टीव्ही मालिका, थ्री इडियट्स, व्हेंटिलेटर अशा लोकप्रिय चित्रपटातून ते भूमिका साकारताना दिसले होते. मात्र गेले काही वर्षे ते आर्थिक संकटांना सामोरे जात होते. ३ वर्षांपूर्वी त्यांचा एक पाय मांड्यापासून कापण्यात आला होता.
त्यानंतर त्यांचा उजवा हातही अर्धांगवायूच्या झटक्याने निकामी झाला होता. गेले काही दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. राजू पटवर्धन हे अविवाहित होते. त्यामुळे अमोल भावे आणि इतर मित्र मंडळी त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. लोकांना मदतीचे आवाहन करून राजू पटवर्धन यांच्यावर उपचार करण्यात आले. राजू पटवर्धन हे गेले काही वर्ष डोंबिवली येथील भरारी विकलांग संस्थेत राहत होते. त्यांच्या पश्चात त्यांना एक भाऊ आहे. ठाण्यातील नाट्यपरिषदेत ते सक्रिय कार्यकर्ते होते. काही दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ जाणवू लागल्याने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगितले जाते.
कलाकारांना कोणी वाली नसतो, वृद्धापकाळात त्यांचे हाल होतात हे अनेकदा समोर आलेलं आहे. राजू पटवर्धन यांच्याही बाबतीत असंच काहीसं घडल्याचं दिसून येतं. आर्थिक संकट, त्यात आजारपण आणि अर्धांगवायूचा झटका यामुळे ते हतबल झाले होते. एक पाय नसल्याने ते अंथरुणाला खिळून होते. शेवटच्या दिवसात त्यांच्यावर आलेली ही परिस्थिती निश्चितच सामान्यांच्या मनाला हेलावून टाकणारी आहे.