अभिनेते नाना पाटेकर हे एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे. आजवरच्या अनेक मुलाखतीत त्यांच्या या स्वभावाचा अनुभव प्रेक्षकांनी घेतलेला आहे. जे आहे ते रोखठोक, नाही पटलं तर समोरच बोलून त्याला फटकारतील असा त्यांचा स्वभावगुण. या स्वभावामुळे मात्र नाना पाटेकर यांना अनेक चांगल्या कामापासून बाजूला व्हावे लागले होते. दिग्दर्शकासोबत होणारे वाद विवाद, मारहाण या गोष्टी केल्याचेही ते कबुक करतात. नुकत्याच एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी बिनधास्त मुलाखत दिली आहे. अगदी तनुश्री दत्ता, विधु विनोद चोप्रा, संजयलीला भन्साळी यांच्यासोबत झालेल्या भांडणाबद्दल त्यांनी इथे खुलासा केला आहे.
चित्रपटात अनेक अपघात घडून आले त्याबद्दलही ते बोलताना दिसले. याच मुलाखतीत नानांनी एक अपरिचित किस्सा इथे शेअर केला आहे. अभिनेत्री निलकांती सोबत नानांनी प्रेमविवाह केला होता. नाटकात काम करत असताना दोघांची ओळख झाली होती. त्यावेळी निलकांती बँकेत नोकरीला होत्या. २५०० रुपये पगार असल्याने त्यांनी नानांना मोठा आधार दिला होता. मल्हार हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. सध्या नाम फाउंडेशनमध्ये मल्हारचे मोठे योगदान आहे. पण मल्हार जन्माला येण्या अगोदर नाना पाटेकर यांना आणखी एक अपत्य झाले होते. पण ते मूल अशक्त असल्याने ते पुढे जगू शकले नाही.
याबद्दल नानांनी खुलासा करताना म्हटले आहे की, “माझा मोठा मुलगा जन्मापासूनच आजारी होता. त्याला आरोग्याच्या काही समस्या होत्या. त्याचा वरचा ओठ फाटलेला होता, एका डोळ्याने त्याला दिसत नव्हते, त्याला पाहूनच माझ्या मनात विचार आले की लोक काय म्हणतील. त्याला पाहून लोक काय विचार करतील की नानांना हा कसला मुलगा झालाय . पण पुढे लोकांना काय वाटेल किंवा कसे वाटेल याचा मी कधी विचार केला नाही. त्याचं नाव होत दुर्वास. त्याने आमच्यासोबत अडीच वर्षे घालवली. पण दैवापुढे तुम्ही काय करू शकता, आयुष्यात काही गोष्टी घडतात त्या घडत गेल्या”.