
मराठी सृष्टीतील बरेचसे कलाकार हिंदी सृष्टीत महत्वाच्या भूमिका साकारताना दिसले आहेत. अभिनेते मोहन जोशी हेही त्यापैकी एक म्हणावे लागतील. सुरुवातीच्या काळात मोहन जोशी यांनी हिंदी चित्रपटातून खलनायकाच्या भूमिका चांगल्या गाजवल्या होत्या. अर्थात हिंदी इंडस्ट्रीत काम केल्यानंतर खूप पैसे मिळतात हे सत्य असल्याने अनेकजण त्या सृष्टीची वाट धरतात. पण या इंडस्ट्रीत अनेक बदल घडत गेले. माणुसकी हरवत चालल्याचे अनेक दाखले या इंडस्ट्रीतून मिळाले आहेत. अनेक कलाकारांची आर्थिक परिस्थितीपुढे वाताहत झाली. तर काहींना अपमानास्पद वागणूक मिळाली.

पण मोहन जोशी यांनी हिंदी इंडस्ट्री सोडण्याचे कारण नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. मोहन जोशी सांगतात की, “एके हंगल यांचं काय झालं, भारत भूषण, भगवान दादा यांना शेवटच्या दिवसात इंडस्ट्रीने बाजूला टाकलं. भगवान दादा अवॉर्ड स्वीकारताना तर म्हणाले होते की ‘हेच जर मला आधी दिलं असतं तर माझ्या औषध पाण्याचा खर्च निघाला असता’. त्यामुळे या इंडस्ट्रीबद्दल मनात एक तिढ बसलीय. मी दिवसात दोन शिफ्ट करायचो पण यामध्ये अनेकदा तोचतोचपणा येऊ लागला. तिथल्या लोकांचा कंटाळा आला मला, ती माणुसकी सोडलेली लोकं आहेत. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची तिथे पद्धत आहे. त्यामुळे इंडस्ट्रीत काम करायचं नाही असं ठरवलं.”

मोहन जोशी यांनी विविध माध्यमातून मुशाफिरी केली आहे. ट्रक ड्रायव्हर, खाजगी नोकरी, नाट्यपरिषदेचे अध्यक्षपद आणि अभिनेते अशा भुमिकेतून वावरत असताना अनेक खस्ता खाल्ल्या. प्रामाणिकपणे काम करूनही ठरावीक लोकांनी त्यांना नावं ठेवली. पण या प्रवासाने खूप काही शिकवण दिली असे ते सांगताना दिसतात.