कुठल्याही सोहळ्याला जाताना जॅकी श्रॉफ न चुकता घेऊन जातात ही गोष्ट पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान
आज २२ जानेवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी क्रिकेट क्षेत्रातील अनेक खेळाडूंसह बॉलिवूड सृष्टीची मांदियाळी अयोध्यानगरीत दाखल झाली होती. दुपारी १ वाजता हा सोहळा संपन्न झाला तेव्हा सर्वत्र प्रभू श्रीरामाच्या नावाचा जयघोष सुरू झाला. अभिनेत्री कंगना राणावत हिनेही या सोहळ्यात उपस्थिती लावून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पहाटेच्या सुमारास बॉलिवूडची कलाकार मंडळी अयोध्येत दाखल झाली होती. याचदरम्यान रणबीर कपूर, आलिया भट, माधुरी दीक्षित, कतरीना कैफ, विकी कौशल, सुभाष घई, रोहित शेट्टी, आयुष्यमान खुराणा यांनाही मीडियाने स्पॉट केले. याच गर्दीत जॅकी श्रॉफ यांचीही झलक पाहायला मिळाली. विशेष म्हणजे जॅकी श्रॉफ यांच्या हातातील एका गोष्टीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलेले पाहायला मिळाले.
जॅकी श्रॉफ न चुकता प्रभू श्रीरामाच्या भेटीला येताना नेहमीप्रमाणे हातात एक रोपटे घेऊन आले होते. हे रोपटे ते श्रीरामाच्या मंदिर परिसरात लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची ही खासियत तुम्हाला अनेक सोहळ्यात पाहायला मिळाली असेलच. काहीच दिवसांपूर्वी आमिर खानच्या लेकीचा म्हणजेच आयरा खानचा नुपूर शिखरे सोबत विवाहसोहळा पार पडला होता. त्यांच्या रिसेप्शन सोहळ्यात जॅकी श्रॉफ यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी देखील जॅकी श्रॉफ यांनी या नवविवाहित जोडप्याला भेट स्वरूपात एक छोटेसे रोपटे देऊ केले होते. जॅकी श्रॉफ यांचा हा अंदाज अनेकांनी अनुभवला आहे त्याचमुळे त्यांच्या या कामाचे सर्वांकडूनच कौतुक केले जात आहे. झाडं आपले आयुष्य वाढवण्यास मदत करतात. जॅकी श्रॉफ यांनी भेट स्वरूपात दिलेले रोपटे त्या व्यक्तीचे आयुष्य वाढवण्यासाठी नक्कीच मदत करेल. कुठलाही फुलांचा गुच्छ देण्यापेक्षा किंवा आर्टीफिशिअल वस्तू देण्यापेक्षा ही भेटवस्तू कित्येक पटीने उत्तमच आहे. ही भेटवस्तू महाग आहे किंवा स्वस्त आहे हे पाहण्यापेक्षा देणाऱ्याची भावना पाहिली जावी.
त्यामुळे अशा भेटवस्तूंची किंमत न केलेलीच बरी असा विचार आता हळूहळू समाजमाध्यमातून पसरत आहे. झाडे जगवा झाडे वाढवा असाही यातून एक छानसा संदेश दिला जात आहे. आताच्या घडीला तर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात वाण म्हणून छोटीशी रोपटी देण्यात येऊ लागली आहे. हा उपक्रम खरोखरच स्तुत्य म्हणावा लागेल. त्याचमुळे जॅकी श्रॉफ यांच्याही या कृतीचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. दोन दिवसांपूर्वी लच मुंबईतील श्रीरामाच्या मंदिरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते त्यावेळी जॅकी श्रॉफ यांनी मंदिराच्या पायऱ्या स्वच्छ केल्या होत्या. त्यावेळी सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ मोठया प्रमाणावर व्हायरल झाला होता. पुन्हा जेव्हा अशी स्वछता करायची असेल तेव्हा मला नक्की बोलवा असे त्यांनी उपस्थितांना म्हटले होते.