वडापाव खायला पैसे नव्हते कामासाठी मित्राकडे ८५० रुपये मागितले तर …. पत्नीच्या निधनानंतर खचलेल्या भूषण कडूने प्रथमच सांगितली परिस्थिती
अभिनय क्षेत्रातून काही कलाकार असे गायब होतात ज्यामुळे त्यांची कित्तेक दिवस चर्चा राहते. असाच काहीसा अनुभव विनोदी अभिनेता भूषण कडू याने घेतला आहे. मराठी बिग बॉसनंतर भूषण कडू मराठी इंडस्ट्रीतून गायबच झाला अशी बातमी व्हायरल झाली होती. अर्थात कोविडच्या काळात भूषणने त्याची पत्नी कादंबरी हिला गमावले होते. यानंतर मात्र त्याचे आयुष्य एका अज्ञातवासात जावे तसे घडत गेले. त्याअगोदर भूषणने त्याच्या पहिल्या पत्नीला गमावले होते. कादंबरीसोबत दुसरा संसार थाटल्यानंतर भूषण सुखी आयुष्य जगत होता. चित्रपट, मालिका, महाराष्ट्राची हास्यजत्रा अशा अनेक कार्यक्रमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. सुरळीत संसार सुरू असतानाच कोविडच्या काळात त्याने पत्नी कादंबरीला गमावले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भूषण कडूने त्याच्या या परिस्थिती बद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
आपल्यावर संकटं ओढवलं की ते चहूबाजूने येतात असच काहीसं भूषणच्या बाबतीत झालं. कारण गेल्या सात ते आठ वर्षांपासून भूषण मराठी इंडस्ट्रीतून बाहेर पडला. पण यामुळे त्याच्यावर अनेक संकटं ओढावली गेली. ‘पत्नी कादंबरीला गमावलं आणि माझ्या आयुष्यातली कादंबरी वाचायची अर्धवट राहून गेली’ अशी भावनिक प्रतिक्रिया तो देतो. दरम्यान मराठी इंडस्ट्रीतून गायब झालेल्या भूषण बद्दल अनेक वाईट गोष्टी पसरवण्यात आल्या. बायको गेल्यानंतर तो मुलीच्याच नादी लागलाय, त्याला काम करायचंच नाहीये, तो दारू पिऊनच पडलेला असतो, काहींनी तर डिक्लेर केलं होतं की तो या जगातच नाहीये अशाही बातम्या पसरवल्या. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून तो नाईलाजाने बाहेर पडला मनाविरुद्ध जाऊन त्याला हा शो सोडावा लागला होता. पण त्या नंतर त्याला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले.
वडापाव खायला देखील पैसे नव्हते अशी वेळ त्याच्यावर आली होती. एवढंच नाही तर जवळच्या मित्रांनीही त्याची साथ सोडली होती. एका कामासाठी भूषणला ८५० रुपयांची गरज होती. जवळच्याच मित्राकडे त्याने ही मदत मागितली पण त्या मित्राने एवढे पैसे देण्यासही नकार दिला होता. कुवत असूनही त्यांनी ती मदत केली नाही. हे सगळं पाहून मात्र भूषण आणखीनच खचला. आयुष्य संपवून टाकावं असा विचार त्याच्या मनात आला. सुसाईड नोट लिहावी असाही त्याने विचार केला. पण मग मुलाचा विचार केला. ‘आपली दुःख बघायला लोकांकडे वेळ नाहीये, आम्हा विनोदी कलाकारांसाठी तर अजिबातच नाहीये ‘ ही खंत तो या मुलाखतीतून बोलून दाखवतो.