अशोक सराफ यांच्या बोटातली अंगठी आहे खूपच खास…म्हणून गेल्या ४८ वर्षांपासून हि अंगठी मी बोटातून कधीच काढली नाही
अभिनयाचे सम्राट म्हणून अशोक सराफ यांनी मराठी सृष्टीतील एक वेगळी ओळख जपली आहे. विनोदी भूमिका असो वा खलनायकाच्या भूमिका त्यांनी त्या आपल्या सहजसुंदर अभिनयाने वठवलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व जे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला जमिनीवर यायला भाग पाडतं. म्हणूनच ते सर्वांचे अशोक मामा म्हणूनही ओळखले जातात. अशोक सराफ यांच्या विविधांगी भूमिकेचं नेहमीच कौतुक केलं जातं. मराठी सृष्टीच्या पडत्या काळात अशोक मामाचं मोठं योगदान आहे पण या यशाचा वाटा ते त्यांच्या बोटातील अंगठीलाही देतात हे बहुतेकांना माहीत नसावं. गेल्या ४८ वर्षांपासून अशोक सराफ आपल्या बोटात अंगठी घालतात ती अंगठी त्यांच्यासाठी तेवढीच महत्वाची आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी या अंगठीचा एक खास किस्सा सांगितला होता.
१९७४ साली अशोक सराफ यांना ही अंगठी त्यांचा मित्र विजय लवेकर यांनी दिली होती. विजय लवेकर हे मेकअपआर्टिस्ट म्हणून या सृष्टीत काम करत होते. त्यांचं एक छोटंसं सोनाराचं दुकान होतं. विजय लवेकर यांनी बनवलेल्या काही खास डिझाईनच्या अंगठ्या ते स्टुडिओमध्ये घेऊन आले होते. एका बॉक्समध्ये असलेल्या अंगठयांमधील एक अंगठी त्यांनी अधिक सराफ यांना निवडण्यास सांगितली. अर्थात एवढ्या सगळ्या अंगठ्या पाहून नेमकी कुठली निवडावी हा प्रश्न मनात न ठेवता त्यांनी त्यातील एक अंगठी निवडली जी त्यांनी लगेचच अनामिकेत घातली. त्या अंगठीवर नटराजाची प्रतिमा कोरण्यात आली होती. महत्वाचं म्हणजे अशोक सराफ यांच्या बोटात ही अंगठी अगदी फिट बसली होती त्या अंगठीकडे निरखून पाहत असताना आता ही अंगठी माझी अशी प्रतिक्रिया त्यांनी विजयला दिली. अंगठी घातल्यानंतर बरोबर तीन दिवसांनी अशोक सराफ यांना चांगला अनुभव आला. पांडू हवालदार या चित्रपटाअगोदर अशोक सराफ यांच्या अभिनयाची कारकीर्द चाचपडत होती मात्र या अंगठीची कमाल की तिसऱ्याच दिवशी त्यांच्या वाट्याला पांडू हवालदार चित्रपटाची ऑफर चालून आली. अशोक सराफ यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळालेला हा चित्रपट या चित्रपटाने त्यांच्या यशाचा आलेख चढताच राहिला.
नवनवीन अनेक दर्जेदार चित्रपटांच्या ऑफर त्यांना येऊ लागल्या. आणि एक खणखणीत नाणं वाजवं तशी त्यांच्या कारकिर्दीची घोडदौड सुरूच राहिलेली पाहायला मिळाली. ह्यावर माझी श्रद्धा आहे किंवा अंधश्रद्धा काहीही म्हणा पण ही अंगठी बोटातून काढायची नाही असा मी निर्णय घेतला होता. यावेळी अशोक सराफ यांनी त्यांच्या लग्नातील सोन्याच्या अंगठीचाही किस्सा सांगितला. निवेदिता जोशी यांनी अशोक सराफ यांना लग्नात सोन्याची अंगठी दिली होती मात्र काही दिवसानंतर ती सोन्याची अंगठी हरवली. पण ही अंगठी मी गेल्या ४८ वर्षांपासून माझ्याकडे जपून ठेवली आहे असे ते उल्लेख करतात. मात्र एका चित्रपटासाठी अशोक सराफ यांना भिकाऱ्याचा रोल करायचा होता त्यावेळी त्यांच्या बोटातली अंगठी कॅमेऱ्यात ठळक दिसू लागली. ही बाब लक्षात येताच दिग्दर्शकाने त्यांना ती अंगठी काढण्यास सांगितली. मात्र अशोक मामांना ती अंगठी काढायची नव्हती यावर त्यांनी एक युक्ती केली, त्यांनी नटराजाची प्रतिमा असलेला ठळक भाग लपवण्यासाठी ती अंगठी तळहाताकडे फिरवली त्यामुळे अंगठीचा बराचसा भाग झाकून गेला आणि फक्त वरच्या बाजूला त्याची रिंग दिसू लागली त्यामुळे दिग्दर्शकाला येणारा अडथळा दूर झाला.