या बालकलाकाराला ओळखलं आज आहे प्रसिद्ध मराठी अभिनेता… ७ व्या इयत्तेत शिकत असताना या चित्रपटात केलं होत काम
आशा काळे, बाळ धुरी, सदाशिव अमरापूरकर, आराधना देशपांडे, लक्ष्मीकांत बेर्डे, सविता मालपेकर, नयनतारा अशी भली मोठी स्टार कास्ट असलेला “आई पहिजे” हा चित्रपट १९८८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील मोहनचे पात्र साकारणारा हा बालकलाकार गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीत स्थिरस्थावर असलेला पाहायला मिळतो. बालकलाकार म्हणून त्याचा हा पहिलाच चित्रपट असला तरी पुढे जाऊन या कलाकाराने सहाय्यक, विनोदी तसेच खलनायकी भूमिका गाजवल्या आहेत. हा अभिनेता आहे शेखर फडके.
७ व्या इयत्तेत शिकत असताना शेखर फडके यांना आई पाहिजे चित्रपटात बालकलाकार म्हणून पहिले काम मिळाले होते. एका अतरंगी ,हट्टी मुलाची भूमिका त्याने यात उत्तम निभावली होती. याच चित्रपटात त्याला त्याच्या वडिलांसोबत झळकण्याची संधी मिळाली होती. शेखर फडके यांचे वडील विजयकुमार फडके यांनी आई पाहिजे चित्रपटात कुळकर्णी मास्तरांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील एक सीन दोघांवर चित्रित झाला आहे. या सिनची आठवण नुकतेच शेखर फडके यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
शेखर फडके हे गेली ४ दशकं मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर गडबड गोंधळ, थैमान, विठूमाऊली, सूत्रधार, आपलं बुवा असं आहे, गाथा नवनाथांची, नवा गडी नवं राज्य, सुख म्हणजे नक्की काय असतं अशा अनेक चित्रपट मालिकांमधून त्यांनी कधी सहाय्यक, विरोधी तर कधी विनोदी भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा अभिनय क्षेत्रातील हा प्रवास असाच पुढे चालू राहो आणि प्रेक्षकांचे मनोरंजन होवो हीच सदिच्छा!.