“चला घेऊया विश्रांती” म्हणत होम मिनिस्टर घेणार तब्बल २० वर्षांने प्रेक्षकांचा निरोप… या दिवशी शेवटचा भाग होणार प्रसारित
“दार उघड बये”… ही टॅग लाईन घेऊन आलेले आदेश बांदेकर आता ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमाला निरोप देत आहेत. झी मराठी वाहिनीने १३ सप्टेंबर २००४ रोजी होम मिनिस्टर हा आगळा वेगळा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. तब्बल २० वर्षे अविरतपणे हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला. महाराष्ट्रातील तमाम गृहिणींना या कार्यक्रमाने बोलतं करून त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्याचजोडीला सहभागी झालेल्या गृहिणींचा पैठणी देऊन सन्मानही करण्यात आला.
याच कार्यक्रमामुळे पैठणी साडीला एक बहुमान देखील मिळाला परिणामी पैठणीची मागणीही वाढू लागली. हे सर्व श्रेय जातं ते होम मिनिस्टर घेऊन असलेल्या झी मराठीला आणि आदेश बांदेकर यांना. पण आता इतके दिवसांचा हा प्रवास इथेच थांबवण्याची वेळ आली आहे अशा आशयाची त्यांची पोस्ट। चर्चेत आली आहे. “१३ सप्टेंबर २००४ ते १३ सप्टेंबर २०२४ (२० वर्ष) प्रवास….प्रवास….प्रवास…चला घेऊया विश्रांती”…असे म्हणत आदेश बांदेकर यांनी होम मिनिस्टरला निरोप दिला आहे. येत्या १३ सप्टेंबर २०२४ रोजी होम मिनिस्टर कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड प्रसारित होत आहे. त्यामुळे निश्चितच प्रेक्षक नाराज झालेले पाहायला मिळत आहेत.
होम मिनिस्टर या कर्यक्रमावर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवलं आहे. पण मधल्या काळात या शोमध्ये अनपेक्षित बदल घडून आले. तथास्तु पैठणीची जागा बदलली, पैठणीचे स्वरूप बदलले, सोमवार ते शनिवार असा अविरत चाललेला हा कार्यक्रम गेल्या काही दिवसात सोमवार ते शुक्रवार याच दिवसात प्रसारित होऊ लागला. गेली कित्येक दिवस शनिवारचा एपिसोड वगळण्यात आला अशा बऱ्याच बदलांनंतर आता अखेर होम मिनिस्टर प्रेक्षकांचा निरोप घ्यायला सज्ज झाला आहे. १३ सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाचा प्रवास इथेच थांबणार आहे. त्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सामान्य महिलांना टीव्ही माध्यमातून झळकण्याची संधी या कार्यक्रमाने मिळवून दिली होती त्यामुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. सर्वात जास्त काळ टिकून राहिलेल्या या शोने आजवरचा हा एक इतिहासच घडवला आहे. त्यामुळे निश्चितच हा शो संपु नये अशी मागणी होत आहे.