तो सीन खरा घडलाय कारण त्या विमानात मी बसलेलो मी तर घाबरून पायलटला म्हटलं…विजय पाटकर यांनी सांगितला रिअल किस्सा

काही कलाकृती या जशाच्या तशा घडलेल्या शूट केल्या जातात. खरं तर याचे क्रेडिट दिग्दर्शकाला द्यावे लागते. पण एखादा सीन तुमच्या जीवावरही बेतू शकतो त्यामुळे कलाकार आणि सहाय्यक यांच्याही डेडिकेशनला तेवढेच महत्व दिले जाते. अक्षय कुमार सारखे काही मोजके कलाकार हे डमी आर्टिस्टची मदत न घेता आव्हानात्मक सीन स्वतःच करतात. त्यात आपले मराठी कलाकारही मागे नाहीत असेच म्हणावे लागेल. २००७ साली प्रदर्शित झालेला ‘धमाल’ हा बॉलिवूड चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
या चित्रपटाचे पुढे सिकवल बनवण्यात आले पण ‘धमाल’ची कमाल काहीतरी वेगळीच होती हे आजही प्रेक्षक मान्य करतील. संजय दत्त, अरशद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, आशिष चौधरी, आसराणी यांचा अभिनय तर उत्तम होताच पण विजय पाटकर, विजय राज, मनोज पाहवा, संजय मिश्रा, विनय आपटे यांनीही जीव ओतून आपापल्या भूमिका सजग केल्या. या चित्रपटातले बरेचसे सीन प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर आहेत. विजय राज वैमानिकाला गाईड करतात तेव्हा एक विमान त्यांच्या केबिनच्या जवळून जाताना दिसते. तो सीन तर अगदी खराखुरा होता यावर तुम्हाला विश्वासच बसणार नाही. नुकतेच विजय पाटकर आणि जयवंत वाडकर यांनी आरजेची शाळा या युट्युब चॅनलला मुलाखत दिली आहे.

या मुलाखतीत विजय पाटकर यांनी हा किस्सा शेअर केला आहे. खरं तर हा सीन शूट करताना विजय पाटकर खूप घाबरलेले होते. याबद्दल ते म्हणतात की, “विमान येताच विजय राज खाली पडतात तो सीन खरा घडलाय कारण त्या विमानात मी बसलेलो होतो. मी तर घाबरून पायलटला म्हटलं ही होतं की मला इथून जाऊ द्या. अजून जवळ, अजून जवळ असं मोटारबाकई सारखं तो ते विमान चालवत होता. एकाचवेळी मी जमीन आणि आकाश दोन्हीही बघू शकत होतो इतका तो शॉट सुपर झाला होता.”