
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी सरकारकडे एक मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास मी चाळ बांधून मंत्रालयात जाणार असे म्हटले आहे. या प्रकरणी सुरेखा पुणेकर यांचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या काळापासून लावणी कलाकारांना काम नाही. हाताला काम नसल्याने या १० हजार कलाकारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तबला, पेटी, ढोलकी वादक यांचं हातावर पोट असल्याने काम झाल्यानंतर लगेचच पैसे द्यावे लागतात.
राज्यात अशा अनेक संस्था आहेत ज्या लावणीसाठी कार्यरत आहेत. एका एका संस्थेत २००-३०० कलावंत काम करतात. पण राज्यात गेल्या काही वर्षांपासून कुठेच लावणीचे कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत, वेगवेगळ्या स्पर्धा भरत नाहीत त्यामुळे या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. थिएटर मालकांनी यांना समजून घ्यायला हवं. राज्यात डान्स बारला बंदी असताना सांस्कृतिक कला केंद्रात डान्स बार, डीजे आयोजित केले जातात हे तात्काळ थांबवलं पाहिजे. सांस्कृतिक कला केंद्रातील डान्स बारचा एक व्हिडिओ त्यांनी माध्यमांसोबत शेअर केला.

काही तरुण त्या महिलेसोबत अश्लील चाळे करतात हे एका व्हिडिओतून त्यांनी निदर्शनास आणून दिले. अशा डान्स बारमुळे आमचे कलावंत देशोधडीला लागलेत. हे असे डान्स बार ताबडतोब बंद करावेत अशी मागणी त्यांनी आज पत्रकार परीषदेत केली आहे. जर शासनाने यावर विचार केला नाही तर चाळ बांधून मंत्रालयात जाणार असा थेट इशाराच त्यांनी राज्यसरकरला दिला आहे.